सिंहगडावर पंचवीस हजार पर्यटकांची गर्दी; घाटरस्त्यावर वाहतूक कोंडी
खडकवासला : Bharat Live News Media वृत्तसेवा : सिंहगड, राजगड आणि तोरणा गडावर रविवारी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे सिंहगड घाट रस्त्यावर वाहतूक नियोजन कोलमडले. घाटरस्त्यावर वाहने उभी करून पर्यटक गायब झाल्याने वाहतूक कोंडी होऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. दिवसभरात चार ते पाच वेळा वाहतूक बंद करून टप्प्याटप्प्याने वाहने सोडण्यात आली.
सिंहगडावर दिवसभरात पंचवीस हजारांवर पर्यटकांनी गर्दी केली होती. सिंहगड वन विभागाचे वनपरिमंडळ अधिकारी समाधान पाटील म्हणाले, ’सुरक्षारक्षक, वनकर्मचार्यांच्या मदतीने नियोजन करण्यात आले होते. मात्र, क्षमतेपेक्षा अधिक वाहने आल्याने वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे टप्प्याटप्प्याने वाहने सोडण्यात आली. दुपारनंतर वाहतूक सुरळीत झाली.’
वाहतूक कोंडीमुळे शेकडो पर्यटकांना घाटात अडकून पडावे लागले. सिंहगड किल्ल्यावर दिवसभरात 1430 दुचाकी व 404 चारचाकी,अशा एकूण 1834 वाहनांची नोंद झाली. तसेच, पर्यटकांकडून 1 लाख 19 हजार रुपयांचा टोल वसूल केला.
खडकवासला धरण चौपाटीवर दोन्ही बाजूंना प्रचंड वाहतूक कोंडी होऊन डीआयडी ते खडकवासला गावापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. किरकटवाडी, नांदेड फाटा आदी ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे हाल झाले. हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी रात्री साडेआठपर्यंत धावपळ करत होते.
महिला गंभीर जखमी
सिंहगडावरून पुणे दरवाजा मार्ग अतकरवाडी पायी रस्त्याने खाली उतरताना पाय घसरून पडल्याने गंभीर जखमी झाली. योगिता भोसले (वय 40, रा. वाकड) असे जखमी महिलेचे नाव आहे. त्या पतीसोबत खाली येत होत्या. पुणे दरवाजाखालील पढेर मेटावर खाली उतरताना पडल्याने योगिता यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. याबाबत माहिती मिळताच सुरक्षारक्षक नीलेश सांगळे, वन संरक्षण समितीचे अध्यक्ष पांडुरंग सुपेकर व स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना स्टेचरवरून गडाच्या पायथ्याला आणले. अतकरवाडी येथून एका वाहनातून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.
राजगडावर दहा हजार पर्यटक
राजगड किल्ल्यावर दिवसभरात दहा हजारांहून अधिक पर्यटकांनी गर्दी केली होती, तर तोरणागडाला चार हजारांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली. गडाच्या पायथ्याचे वेल्हे बुद्रुक येथील वाहनतळ हाऊस फुल्ल झाले होते.
हेही वाचा
सिंहगडावर पंचवीस हजार पर्यटकांची गर्दी; घाटरस्त्यावर वाहतूक कोंडी
कानदुखीची कारणे काय? जाणून घ्या सविस्तर
लेप्टोस्पायरॉसिस : हा रोग कसा पसरतो?