कानदुखीची कारणे काय? जाणून घ्या सविस्तर
डॉ. संतोष काळे
चेहर्याच्या जवळ असणारे कान, नाक आणि घसा हे तीनही अवयव एकमेकांशी अंतर्गत भागातून जोडले गेलेले असतात. कानाच्या मध्यापासून निघणारी घशाच्या मागच्या बाजूला जाणारी युस्टेचियन ट्यूबमध्ये अडथळा निर्माण होतो आणि कानदुखी भेडसावते. कानाच्या मधल्या भागाला सूज येते किंवा संसर्ग होतो त्यामुळे वेदना होतात. कानात खाज येणे, बुरशी साठणे, कानातील मेण किंवा ज्याला सामान्य भाषेत मळ म्हणतात तो जास्त किंवा कमी होणे या समस्यांमुळे कान दुखतो. या सामान्य समस्यांमध्येही निष्काळजीपणा केला तर बहिरेपण येऊ शकतो. कानामध्ये वेदना दोन प्रकारे होतात. कानाच्या आतल्या किंवा बाहेरच्या बाजूस काही इजा, दुखापत किंवा गडबड झाली तर वेदना होतात. दुसरी गोष्ट म्हणजे कानाशी निगडित इतर अवयव जसे घसा दुखणे, दात दुखी यामुळेही कान दुखू शकतो.
सायनस आणि टॉन्सिल्स सुजले तरीही कान दुखतो. यामध्ये कानाला आतून सूज येते आणि युस्टेचिनय ट्यूब बंद होऊ लागते. कानात पू तयार होऊन कानाच्या पडद्याचे नुकसान होते. आई झोपून आपल्या जन्मलेल्या बाळाला एका अंगावर झोपवून जेव्हा दूध पाजते त्यावेळेला बाळाने प्यायलेले दूध कानामध्ये जाऊ शकते. त्यातून संसर्ग होऊ शकतो.
काही लोकांची त्वचा तेलकट असते त्यांना कानात साठणार्या मळाचा अधिक त्रास होतो. हा मळ कानातून काढला तरीही पुन्हा वाढतो. बोटाची नखे जशी काही काळाने वाढतात तसाच हा मळही वाढतो. कानातील हे मेण किंवा मळ जास्त काळ जमा राहिले तर ते कडक होते आणि कानाची वाहिनी बंद होते. त्यामुळे कानात वेदना होतात आणि मुख्य म्हणजे श्रवणशक्ती कमी होते.
मध्यकर्णदाह हा कानाच्या मधल्या भागात होणारा संसर्ग आहे. मुलांमध्ये या प्रकारचा संसर्ग अधिक प्रमाणात होताना दिसतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मतानुसार दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ संसर्ग राहिल्यास ते गंभीर संसर्ग असल्याचे मानले जाते. त्यामुळे व्यक्तीला बहिरेपण येऊ शकते. मात्र, हा संसर्ग बरा होऊ शकतो. हा संसर्ग कशामुळे होतो तर सर्दी किंवा फ्लूचा विषाणू, धुळीचे वावडे असणे या गोष्टींमुळे संसर्ग होतो. त्यात अति ताप, कानात वेदना होणे, ऐकायला येण्यात त्रास होणे किंवा कानात मळ साठणे आदी समस्या होऊ शकतात.