‘कॉर्टिकल डेंटल इम्प्लांट’ म्हणजे काय?
डॉ. प्रीतम साळुंखे
कायमस्वरूपी दात बसवण्यासाठी कराव्या लागणार्या क्लिष्ट व अधिक वेळखाऊ पारंपरिक दंतप्रत्यारोपण शस्त्रक्रियेला एक उत्तम, आधुनिक, शास्त्रीय आणि कमी त्रासदायक व सहजसाध्य पर्याय उपलब्ध आहे. याला ‘कॉर्टिकल डेंटल इम्प्लांट’ असे म्हणतात. या उपचारपद्धतीविषयी…
निरोगी शरीरासाठी पोषण आहाराचे जितके महत्त्व आहे तितकेच ग्रहण केलेल्या अन्नाची पचनप्रक्रियाही सुव्यस्थित असणे आवश्यक आहे. अन्यथा, अपचन, त्यामुळे होणारी अॅसिडिटी यांसह अनेक समस्या जडतात आणि त्याकडे दुर्लक्ष होत राहिल्यास पुढे जाऊन गंभीर व्याधी जडण्याचीही शक्यता असते. अलीकडील काळात आरोग्याविषयीची जागृती वाढल्यामुळे पचनक्रिया योग्य राहावी यासाठी जेवणानंतर चालणे, नियमित व्यायाम करणे, तडस लागेपर्यंत न जेवणे यांसारख्या बाबी अनेक जण करताना दिसतात. परंतु हे सर्व करत असताना एक मुख्य बाब दुर्लक्षित राहते, ती म्हणजे आपण ग्रहण करत असलेले अन्न नीट चावले न जाणे. यामध्ये दातांची भूमिका महत्त्वाची असते. किंबहुना, पचनप्रक्रियेमध्ये सहभागी होणार्या शरीरातील अवयवांमध्ये दात हे पहिल्या स्थानी असल्याने त्यांची भूमिका सर्वाधिक असते. परंतु, दातांच्या आरोग्याबाबत आजही पुरेशी जागरूकता दिसत नाही. परिणामी, दंतव्याधींचा सामना करावा लागतो.
खरे पाहता, आरोग्याच्या दृष्टीनेच नव्हे, तर सौंदर्य, व्यक्तिमत्त्व यामध्येही स्वच्छ, निरोगी दात महत्त्वाचे ठरतात. याची जाणीव दात गमावल्यानंतर प्रकर्षाने होते. दात गमावल्यानंतर अन्न चावून खाण्यामध्ये अडचणी येतात. अन्नामध्ये पुरेशा प्रमाणात लाळ मिसळली जात नाही. सुग्रास अन्न असूनही जेवणाचा आस्वाद घेणे दुर्मीळ होऊन बसते. अन्नाचे नीट चर्वण न केले गेल्यामुळे अपचनाच्या समस्या वाढतात. अशीच स्थिती कायम राहिल्यास चेहर्यावर कमी वयातच वृद्धत्वाच्या खुणा दिसू लागतात.
वास्तविक आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आता दात गमावल्यानंतरची काळजी दूर करणे शक्य झाले आहे. यामध्ये कवळी बसवणे हा पारंपरिक पर्याय तर आहेच; पण त्याजोडीला दंतप्रत्यारोपणही आता सहजशक्य झाले आहे. कवळी वापरण्याच्या प्रक्रियेमध्ये अनेकांना अडचणी येतात. याचे कारण कवळीला हाडांचा पुरेसा आधार नसतो. त्यामुळे टणक पदार्थ खाता येत नाहीत किंवा खाताना त्रास होतो. तसेच रात्री झोपताना दातांची कवळी काढून ठेवावी लागते. हिरड्यांची झीज झाली असल्यास कवळी नीटप्रकारे न बसल्यामुळे हिरड्यांना सूज येणे, हिरड्यांमधून रक्त येणे असेही प्रकार पाहायला मिळतात.
यावर उपाय म्हणून पारंपरिक दंतप्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करता येते. पण, यामध्ये दात बसवण्यासाठी बराच काळ जावा लागतो. त्यामुळे रोजच्या खाण्याच्या सवयी सुरू होण्यास बराच विलंब होतो. यामध्ये जबड्याच्या कमी कडक भागात नवीन दात बसवले जातात. यानंतर रोपण आणि हाड जुळून येण्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागते. यावर उपाय म्हणजे आता नवीन दात बसवण्यासाठी कॉर्टिकल इम्प्लांट नावाचे नवीन तंत्रज्ञान वापरले जाते. हे तंत्रज्ञान प्रामुख्याने ऑर्थोपेडिक संकल्पनेवर काम करते. यामध्ये इम्प्लांट हाडाच्या कठीण भागावर किंवा जबड्यात बसवून त्यावर नवीन दात बसवले जातात. याद्वारे 72 तासांत नवीन दात त्यांच्या जागी स्थिर होतात. हे तंत्रज्ञान शस्त्रक्रिया विरहित असल्यामुळे यामध्ये रक्तस्राव कमी होतो आणि सूज येण्याची शक्यताही कमी असते. रुग्णांना या प्रक्रियेनंतर लवकरच दैनंदिन जीवनातील खाण्याच्या सवयीप्रमाणे खाणे सुरू करता येते. पायोरियासारख्या दंतविकारांबाबत या तंत्राचा वापर करून प्रभावित दात काढून नवीन दात बसवता येणे शक्य आहे. कॉर्टिकल इम्प्लांटद्वारे जबड्याच्या कठीण हाडात दात बसवले जात असल्याने ते पारंपरिक दंतरोपणांपेक्षा अधिक काळ टिकतात. ही आधुनिक पद्धती बर्याच अंशी वेदनारहित असल्यामुळे अलीकडील काळात ती चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. यामध्ये की-होल पद्धतीचा वापर केला जातो. कॉर्टिकल इम्प्लांट जबड्याचे हाड रिसॉर्ब झाले असेल तरीही करता येते. अशा प्रकरणांमध्ये पारंपरिक दंतप्रत्यारोपण शक्य होत नाही. त्यामुळे कॉर्टिकल इम्प्लांटस्च्या पर्यायाचा अवलंब करून दातांशिवाय आयुष्य जगताना येणार्या अडचणींना कायमचा बाय बाय करता येतो.
दुधाचे दात जाऊन कायमस्वरूपी म्हणून आलेले दात पडले की पुन्हा येत नाहीत, असे आपण पूर्वापार ऐकत आलो आहोत; पण एकविसाव्या शतकातील नवतंत्रज्ञानाच्या युगात हा पारंपरिक विचार मागे पडला आहे, असे म्हणावे लागेल.