जून संपला तरी जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा : नऊ धरणे कोरडीठाक
नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा – जूनच्या अखेरचा आठवडा सुरू झाला असूनही जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पुरेशा पावसाअभावी नऊ धरणे कोरडीठाक पडली असून, नऊ धरणांमध्ये १० टक्क्यांहून कमी जलसाठा आहे. नाशिककरांना पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूरमध्ये अवघे १७.८३ टक्के पाणी उपलब्ध आहे.
मान्सूनने महाराष्ट्रात वेळेआधीच वर्दी दिली. नाशिकमध्येही वेळेच्या दोन दिवस आधीच पावसाने हजेरी लावली. त्यामुळे दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या जिल्हावासीयांना दिलासा मिळाला. मात्र, जूनच्या प्रारंभी दमदार हजेरी लावल्यानंतर साधारणत: गेल्या 10 दिवसांपासून पावसाने दडी मारली. परिणामी त्याचा फटका थेट जिल्ह्यातील धरणांच्या पाणीपातळीवर झाला आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये सद्यस्थितीत पाच हजार १९५ दलघफू साठा असून, त्याचे प्रमाण जेमतेम ७.९१ टक्के इतके आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा साठा २३.११ टक्के म्हणजेच १५ हजार १७५ दलघफू होता.
नाशिक व त्र्यंबकेश्वर तालुक्यांकडे पावसाने पाठ फिरवली आहे. परिणामी नाशिककरांना पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात १,००४ दलघफू जलसाठा आहे, तर धरण समूहात १,६२१ दलघफू (१५.९५ टक्के) साठा आहे. पावसाचा लहरीपणा कायम राहिल्यास नाशिककरांवर पाणी कपात लागू केली जाऊ शकते. महाराष्ट्राची चेरापुंजी अशी ओळख असलेल्या इगतपुरीत पावसाने दडी मारल्याने दारणा समूहाच्या जलसाठ्यातही झपाट्याने घट झाली. समूहातील सहा प्रकल्पांत अवघा ८३७ दलघफू (४.४३ टक्के) पाणीसाठा आहे. ओझरखेड समूह कोरडाठाक पडला असून, पालखेड समूहात २९२ दलघफू (३.५१ टक्के) पाणी उपलब्ध आहे. दरम्यान, चणकापूर खोऱ्यालाही पावसाची प्रतीक्षा आहे. समूहात अवघा २,४४५ दलघफू (१०.६ टक्के) जलसाठा आहे.
…तर भीषण स्थिती
जिल्ह्यात यंदाच्या हंगामात सरासरी १०४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पूर्व पट्ट्यातील दुष्काळी तालुक्यांमध्ये दमदार पाऊस झाला. मात्र, धरणांना त्याचा कोणताही फायदा झालेला नाही. येत्या काळातही पावसाने पाठ फिरवल्यास जिल्ह्यातील दुष्काळाची स्थिती अधिक भीषण होणार आहे.
धरणांची परिस्थिती
शून्य टक्के साठा : ओझरखेड, पुणेगाव, तिसगाव, भावली, वालदेवी, भोजापूर, नागासाक्या, पुनद, माणिकपुंज.
१ ते १० टक्के साठा : दारणा, आळंदी, करंजवण, वाघाड, मुकणे, कडवा, चणकापूर, हरणबारी, केळझर.
१० टक्क्यांपेक्षा अधिक साठा : गंगापूर, काश्यपी, गौतमी-गोदावरी, पालखेड, नांदूरमध्यमेश्वर,
हेही वाचा:
नाशिक : सप्तशृंग गडावर दरड कोसळण्याचा संभाव्य धोका; प्रशासन सज्ज, 91 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार
अल्पवयीनावर गोळीबार करणारे दोघे ताब्यात; पूर्ववैमनस्यातून घडलेला प्रकार