गरजू कर्जदारांना विनातारणाच्या नावाने लाखो रुपयांचा गंडा
नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा – गरजू कर्जदारांना विनातारण, विना जामीनदार व सीबिल न तपासता कर्ज देण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणाऱ्या हाक मराठी अर्बन निधी लि. बँकेच्या मुख्य संशयितास शहर पोलिसांनी अटक केली आहे. भूषण सुरेश वाघ (३१, रा. डीजीपीनगर २, नाशिक, मूळ रा. ता. सिंधखेडा, जि. धुळे) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे.
भूषण वाघ याने नाशिकसह राज्यभरातील अनेक गरजू कर्जदारांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. अंबड पाेलिस ठाण्यात फसवणूक, अपहार, महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंरक्षण कायद्यानुसार (एमपीडीआय) भूषण वाघ यांच्यासह इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयितांनी उत्तमनगर बसस्टॉपजवळ हाक मराठी अर्बन निधी बँक सुरू केली होती. या बँकेतून कर्जदारांना विनातारण, सीबिल न तपासता व विना जामीनदार कर्ज देण्याचे आमिष दाखवण्यात आले. त्यामुळे पैशांची आवश्यकता असणाऱ्या नागरिकांनी बँकेत संपर्क साधला. त्यामुळे बँकेतील संशयितांनी नागरिकांना ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याच्या बहाण्याने विविध शुल्कांच्या नावे १७ हजार ५०० रुपये प्रत्येकी घेतले. त्यानुसार त्यांनी २०४ सभासदांकडून ३४ लाख १६ हजार ३८२ रुपये जमा केले. मात्र, नागरिकांना कर्ज मिळत नसल्याने त्यांनी बँकेत चौकशी केल्यावर त्यांना उडवाउडवीचे उत्तर देण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी अंबड पोलिसांकडे धाव घेत तक्रार घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपआयुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक इरफान शेख व समाधान वचव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास करीत संशयित वाघ यास पकडले आहे. न्यायालयाने त्यास मंगळवार (दि.२५)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात बँकेचा अध्यक्ष वाघ याच्यासह संचालक मंडळ, कर्मचारी अशा ९ जणांविरोधात गुन्हा दाखल आहे.
अशी करायचा फसवणूक
पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज पाहिजे असल्यास सुरुवातीस बँकेचे सभासदस्यत्व स्वीकारावे लागेल, असे वाघ याने २०४ सभासदांना सांगितले. त्यासाठी सभासद फी-पंधराशे रुपये, कर्जाचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यासाठी दाेन हजार रुपये, इन्शुरन्ससाठी तीन हजार रुपये, व्हेरिफिकेशन फी एक हजार रुपये असा साडेसात हजार रुपयांचा खर्च सांगितला. त्यानंतर वाघ याने पैसे गोळा करण्यासाठी क्यूआर कोड सभासदांच्या व्हाॅट्सअॅपवर पाठवून पैसे घेतले. पैसे मिळाले तरी कर्ज मंजूर न झाल्याने सभासदांनी चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघड झाला.
हेही वाचा:
जगातील सर्वात गरीब देश
बालकांना व्यसनांपासून रोखणार अॅक्शन प्लॅन!