लोकसभेचे प्रभारी अध्यक्ष, कशी होते नियुक्ती, काय असते जबाबदारी
नवी दिल्ली : ओडिशातील कटक लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे ज्येष्ठ खासदार भर्तृहरी महताब यांची १८ व्या लोकसभेचे प्रभारी लोकसभा अध्यक्ष (प्रोटेम स्पीकर) म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली. मात्र, ही नियुक्ती कशी आणि कोण करते, प्रभारी अध्यक्षांकडे नेमक्या कोणत्या जबाबदाऱ्या असतात, असे प्रश्न अनेकांना पडले असतील, चला तर जाणून घेऊया या पदासंदर्भात…
नियुक्तीची प्रक्रिया अशी…
निवडून आलेल्या खासदारांची नवीन लोकसभा स्थापन होते. या नवीन लोकसभेच्या अध्यक्षांच्या निवडीपूर्वी प्रभारी अध्यक्ष निवडला जातो.
संसदीय परंपरेनुसार, प्रभारी अध्यक्षांच्या नियुक्तीमध्ये सर्वात ज्येष्ठ लोकसभा सदस्याला प्राधान्य दिले जाते.
ज्येष्ठ खासदार हा सत्ताधारी पक्षाचा किंवा विरोधी पक्षाचा असू शकतो.
सत्ताधारी पक्ष संसदीय कामकाज मंत्रालयामार्फत प्रभारी अध्यक्षांचे नाव राष्ट्रपतींकडे पाठवतो. राष्ट्रपती त्यावर निर्णय घेतात.
प्रभारी अध्यक्षांचे मुख्य काम काय?
प्रभारी अध्यक्ष हे खासदारांना शपथ देतात. यानंतर प्रोटेम स्पीकरच्या अध्यक्षतेखाली सर्व लोकसभा सदस्य शपथ घेतात. सर्व सदस्यांनी शपथ घेतल्यानंतर लोकसभेच्या अध्यक्षाची निवड केली जाते.
प्रोटेम हा शब्द कुठून आला?
प्रोटेम हे लॅटिन शब्द ‘प्रो टेम्पोर’चे लहान रूप आहे. ज्याचा अर्थ ‘काही काळासाठी’ असा होतो. लोकसभेच्या नवीन अध्यक्षाची नियुक्ती होईपर्यंत प्रभारी अध्यक्ष (प्रोटेम स्पीकर) ची नियुक्ती केली जाते. हे ३ प्रभारी अध्यक्ष बनले होते अध्यक्ष देशात स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंतच्या सर्व लोकसभेतील अध्यक्षांची निवड एकमताने होत आलेली आहे. दुसरी विशेष बाब म्हणजे यापूर्वी प्रभारी अध्यक्ष म्हणून नियुक्त झालेले गणेश वासुदेव मावळणकर, हुकूम सिंह आणि सोमनाथ चटर्जी यांची पुढे लोकसभा अध्यक्ष म्हणून निवड झाली होती.
हेही वाचा :
आजपासून संसदेचे अधिवेशन; लोकसभा अध्यक्ष निवडीकडे लक्ष
महायुतीत विधानसभेसाठी रस्सीखेच; भाजप धरणार १७० जागांचा आग्रह