आकाशात 80 वर्षांनतर होणार तारकीय स्फोट
वॉशिंग्टन : अवकाशात अनेक विस्मयना घडत असतात. बर्याचदा या सर्व घटना सर्वसामान्यांना साध्या डोळ्यांनी पाहताही येत नाहीत. मात्र, लवकरच अवकाशप्रेमींना 80 वर्षांनंतर होणारा तारकीय स्फोट पाहण्याची संधी मिळू शकेल, असा संशोधकांचा होरा आहे. एरवी, दर 80 वर्षांनंतर होणारा हा तारकीय स्फोट इतका मोठा व शक्तिशाली असतो की, याचे द़ृश्य लाखो किलोमीटर अंतरावरून साध्या डोळ्यांनीही पाहता येऊ शकते. संशोधकांच्या मते, हा स्फोट येत्या काही दिवसांत केव्हाही घडू शकतो.
हा स्फोट म्हणजे तारकीय स्फोट अर्थात स्टेलर एक्स्प्लोजन असते. हा स्फोट इतका मोठा आणि शक्तिशाली असतो की, त्यापुढे विश्वातले अनेक चमत्कारही छोटे ठरतील. ही घटना अनुभवण्यासाठी शास्त्रज्ञ खूप उत्सुक आहेत; मात्र या घटनेचा पृथ्वीवर काही परिणाम होईल की नाही त्याबाबत सध्या काही सांगता येणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. एका रिपोर्टनुसार, अवकाशात जेव्हा श्वेत बटू तारा फुटतो तेव्हा अशी रंगीबेरंगी आतषबाजी झालेली दिसून येते. या घटनेनंतर त्या तार्याची चमक दहा हजार पटींनी वाढते. हा खूप शक्तिशाली स्फोट असतो. त्यामुळे तो साध्या डोळ्यांनीदेखील पाहता येऊ शकतो.
नासाचे शास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ ही घटना पाहण्यासाठी खूप वाट पाहत आहेत. याला नोव्हा इव्हेंट असेही म्हटले जाते. यात एक श्वेत बटू तारा आजूबाजूच्या मोठ्या आणि ज्वलंत लाल राक्षसी तार्याकडून सौर सामग्री ओढून घेतो. त्यातून उत्पन्न होणारी उष्णता आणि दाब खूप वाढतो आणि त्याचा परिणाम म्हणून थर्मोन्यूक्लिअर स्फोट होतो. यामुळे आकाशातला तो श्वेत बटू तारा अधिक तेजस्वी दिसू लागतो. मात्र, तो तारा या स्फोटामुळे पूर्णपणे नामशेष होत नाही.
जेव्हा तो स्फोट संपतो, तेव्हा तो तारा त्याच्या मूळ तेजाच्या रूपात परत येतो. हा महाकाय स्फोट म्हणजेच नोव्हा. ही घटना जेव्हा घडत असते, तेव्हा एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधीसाठी आपण साध्या डोळ्यांनी ती पाहू शकतो. ही एक खगोलीय घटना असते. ती घडते तेव्हा आकाशात एखादा नवा तारा प्रकट होत असल्यासारखं भासते. नासाच्या माहितीनुसार, हा स्फोट आतापासून सप्टेंबर महिन्यापर्यंत दिवसा किंवा रात्री कधीही घडू शकतो. काही शास्त्रज्ञांच्या मते यासाठी आणखी कालावधीही लागू शकतो. याचा पृथ्वीवर काही प्रभाव पडेल का, याबाबत काहीही सांगता येत नाही. मात्र, शास्त्रज्ञ या खगोलीय घटनेकडे डोळे लावून बसले आहेत.