सातारा : तब्बल २७ वर्षांनंतर मिळाला हक्काचा निवारा

सणबूर :  वांग मराठवाडी धरणात या वर्षी पाणी साठा गेल्या वर्षा इतकाच होणार असून अद्याप धरणात पूर्ण क्षमतेने पाणी अडवलं जाणार नाही. तर दुसरीकडे मूळ गावातील घरे पाण्यात बुडाल्यामुळे निवारा शेंडमध्ये राहिलेल्या उमरकांचन येथील 52 कुटुंबांचे दुसर्‍या टप्प्यातील ऐच्छिकमधील पुनर्वसन आता अंतिम टप्प्यात आले आहे. जलाशयाच्या वरील बाजूला पुनर्वसन गावठाणात नवीन इमारती उभ्या रहात असताना …

सातारा : तब्बल २७ वर्षांनंतर मिळाला हक्काचा निवारा

तुषार देशमुख

सणबूर :  वांग मराठवाडी धरणात या वर्षी पाणी साठा गेल्या वर्षा इतकाच होणार असून अद्याप धरणात पूर्ण क्षमतेने पाणी अडवलं जाणार नाही. तर दुसरीकडे मूळ गावातील घरे पाण्यात बुडाल्यामुळे निवारा शेंडमध्ये राहिलेल्या उमरकांचन येथील 52 कुटुंबांचे दुसर्‍या टप्प्यातील ऐच्छिकमधील पुनर्वसन आता अंतिम टप्प्यात आले आहे. जलाशयाच्या वरील बाजूला पुनर्वसन गावठाणात नवीन इमारती उभ्या रहात असताना अनेक वर्षे कुडामेडीच्या व मोडतोड होऊन ढासळत चालेल्या घरात दिवस काढलेल्या धरणग्रस्तांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहताना दिसत आहे.
गेली सत्तावीस वर्षे शासनाशी संघर्ष करुन अखेरीस जलाशयाच्यावर धरणग्रस्तांना गावठाणासाठी जागा मिळाली आणि त्या ठिकाणी आज भव्य अशी धरणग्रस्तांची घरे उभी राहात आहेत आहेत याचा आनंद त्यांच्या डोळ्यातून येणार्‍या आनंदाश्रूच्या रुपात दिसत आहे. 27 वर्षांपूर्वी वांग मराठवाडी धरणाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली. कधी धरणग्रस्तांचे आंदोलने तर कधी निधीचा तुटवडा त्यामुळे धरणाचे काम 2001 ते 2008 सालापर्यंत अनेक वर्षे रखडत गेले. रेठरेकऱ वाडी, उमरकांचन, घोटील, यादव वाडी, मेंढ, केकतवाडी येथील अनेक कुटुंबे पाटण कराड तालुक्यात व सांगली जिल्ह्यात विस्थापित झाली आहेत. मात्र मेंढ, उमरकांचन येथील काही धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न जटिल बनला होता. त्यामुळे कुटुंबे जलाशयाच्या काठावर असणार्‍या घरातच अनेक वर्षे राहत होती.
2011 साली धरणात पहिल्यांदा 0.60 टी. एम. सी. पाणीसाठा करण्यात आला. त्यावेळी मेंढ येथील पुजारी कुटुंब यांचे घर बुडाले. त्यामुळे रातोरात त्यांना तात्पुरता निवारा शेड देऊन स्थलांतर केले. उरलेले आज ना उद्या पुनर्वसन होईल मग कशासाठी मोडतोड झालेली घरांची दुरुस्ती करायची म्हणूनच जुन्याच झालेल्या घरात 22 वर्ष ही कुटुंबे जीव मुठीत घेऊन जगत होती. 2017 मध्ये
वांग—मराठवाडी प्रकल्पाचा प्रधानमंत्री सिंचन योजनेत समाविष्ट करण्यात आला. त्यानंतर खर्‍या अर्थाने धरणाच्या कामाला गती मिळाली. प्रत्येक कुटुंबाला 17 लाख 12 हजार 196 रुपये रोख रक्कम व वांग धरणाच्या जलशयाच्या वरच्या बाजूला घरे बांधण्यासाठी शासनाने पुनर्वसन गावठाण दिले आहे. त्यामुळे पुनर्वसनाची प्रक्रिया जलद गतीने सुरू असल्याचे धरणग्रस्तांचे प्रतिनिधी सांगत आहेत.
2013 सालचा जुना जमीन संपादन कायदा रद्द झाल्याने शासनाने स्वतः शेतकर्‍यांच्या जमीन खरेदी करून धरणग्रस्तांना भूखंड वाटप केले आहेत. पहिल्या टप्प्यात जमीन ऐवजी रोख रक्कम मिळालेल्या 218 कुटुंबाची पुनर्वसनाची मोठी प्रक्रिया पार पडली आहे यात 82 कुटुंबाना उमरकांचन तर 55 कुटुंबांना मेंढ येथील गावठाण मध्ये भूखंड देऊन पुनर्वसन केले आहे.उमरकांचन नवीन पुनर्वसन गावठाणमध्ये बर्‍याच धरणग्रस्तांनी घर बांधली आहेत, तर आजून काही घराची बांधकाम चालू आहेत. काही धरणग्रस्तांना भूखंड देणे बाकी असल्यामुळे अद्याप त्यांनी घर बांधलेली नाहीत.तसेच मेंढ येथील नवीन पुनर्वसन गावठाण मध्ये नागरी सुविधा अपूर्ण असल्याने अजून धरणग्रस्त तात्पुरता निवारा शेड मध्येच राहत आहेत.
आता दुसर्‍या टप्प्यात उमरकांचन येथील 52 कुटुंबाना जमीन ऐवजी रोख रक्कम देऊन व नवीन पुनर्वसन गावठाण मध्ये नागरी सुविधा व भूखंड दिले असुन धरणग्रस्त नव्याने घरांची बांधकामे काम चालू आहे. 27 वर्षे संघर्षमय आयुष्य जगणार्‍या धरणग्रस्तांच्या चेहर्‍यावर त्यामुळे आता समाधान दिसत आहे.