सांगली : फौजदार पदाच्या प्रतीक्षेत 60 अंमलदार!
अंजर अथणीकर
सांगली : फौजदार होण्याचे स्वप्न बाळगून 2013 ची अर्हता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या जिल्ह्यातील 60 पोलिस अंमलदारांना अद्यापही पदोन्नती न मिळाल्याने त्यांना पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदापासून वंचित राहावे लागत आहे. राज्यातील हा आकडा सहा हजाराच्या घरात आहे. शासनाने याबाबत वेळकाढू धोरण अवलंबल्याने जिल्ह्यातील 55 जण सेवानिवृत्तही झाले आहेत.
फौजदारपदी पदोन्नती देण्यासाठी राज्य शासनाकडून खात्यांतर्गत 2013 मध्ये लेखी परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये जिल्ह्यातील 230 पैकी 170 जण उत्तीर्ण झाले होते. राज्यातील हा आकडा जवळपास चौदा हजाराच्या घरात होता. परीक्षेनंतर जवळपास सहा वर्षे भरतीच करण्यात आली नाही. त्यानंतर नेमणुका देण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत 1991 पर्यंत भरती झालेल्या कर्मचार्यांना पोलिस उपनिरीक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर मात्र नियुक्ती झालेली नाही. याच्या प्रतीक्षेत आतापर्यंत 55 जण सेवानिवृत्तही झाले आहेत. आता जिल्ह्यात 60 जणांची अद्याप सेवा बाकी आहे. ते या पदाचा प्रतीक्षेत आहेत. राज्यातील हा आकडा सहा हजाराच्या घरात आहे.
पोलिस कर्मचार्यांनी निवेदने दिली, सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली. अर्हता पास कर्मचार्यांना एकृूण भरतीच्या 25 टक्के जणांना याचा लाभ देण्यात यावा, असा निर्णय झालेला असताना, अद्याप शासनाकडून याची अंमलबजावणी झालेली नाही. गेल्या 10 महिन्यांपासून पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पत्रव्यवहार सुरू आहे. काही अंमलदारांची सेवानिवृत्तीही काही दिवसांवर आली असताना त्यांना पदोन्नती मिळाली नाही.
आठवडा असताना नियुक्ती
जिल्ह्यातील अनेक पोलिस कर्मचार्यांना त्यांच्या सेवेचा कालावधी आठवडा उरला असताना त्यांना पोलिस उपनिरीक्षक पदाची नियुक्ती देण्यात आली आहे. यामुळे त्यांना सेवानिवृत्ती पेन्शनचा लाभ फौजदार पदाचा मिळण्यास मदत झाली आहे. सहायक पोलिस उपनिरीक्षक (एएसआय) आणि पोलिस उपनिरीक्षक पदाच्या वेतनामध्ये दीड ते दोन हजार रुपयांचा फरक आहे.