‘रिफंड’साठी बँक खात्याचे ‘व्हॅलिडेशन’ महत्त्वाचे

बहुतांश नोकरदारांना कंपनीकडून फॉर्म 16 मिळाला असेल आणि अनेकांनी आयटीआर भरण्याची प्रक्रियादेखील सुरू केली असेल. आयटीआर भरताना आपल्या बँक खात्याचे व्हॅलिडेशन करणे महत्त्वाचे आहे. यासंदर्भात प्राप्तिकर खात्याने विशेष लक्ष देण्याची सूचना केली आहे. कारण एखाद्याचा रिफंड असेल आणि आयटीआर भरणार्‍यांच्या बँक खात्यात बदल असेल, तर रिफंडची प्रक्रिया पूर्ण करताना प्राप्तिकर खात्याला अडचणी येतात आणि परिणामी …

‘रिफंड’साठी बँक खात्याचे ‘व्हॅलिडेशन’ महत्त्वाचे

स्वाती देसाई

बहुतांश नोकरदारांना कंपनीकडून फॉर्म 16 मिळाला असेल आणि अनेकांनी आयटीआर भरण्याची प्रक्रियादेखील सुरू केली असेल. आयटीआर भरताना आपल्या बँक खात्याचे व्हॅलिडेशन करणे महत्त्वाचे आहे. यासंदर्भात प्राप्तिकर खात्याने विशेष लक्ष देण्याची सूचना केली आहे. कारण एखाद्याचा रिफंड असेल आणि आयटीआर भरणार्‍यांच्या बँक खात्यात बदल असेल, तर रिफंडची प्रक्रिया पूर्ण करताना प्राप्तिकर खात्याला अडचणी येतात आणि परिणामी रिफंड मिळण्यास अडचणी येतात. म्हणून विशेष खबरदारीची सूचना केली आहे. आयटीआर भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. मात्र करदात्यांनी आयटीआरसाठी शेवटच्या दिवसांची वाट पाहू नये. तज्ज्ञांच्या मते, शेवटच्या क्षणी आयटीआर दाखल करताना चुका होण्याची शक्यता अधिक असते.
प्राप्तिकर खात्याकडून रिफंड मिळवण्यासाठी बँक खाते व्हॅलिडेटेड असणे गरजेचे आहे. कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे करदात्यांच्या बँक खात्याचे विवरण बदलते. नोकरीतील बदल, शहर बदल आदी. त्यामुळे बँक बदलते, कधी बँकेची शाखा, तर कधी बँकेचा आयएफएससी कोड बदलतो. अनेकदा तर दोन खात्यांमुळेही विवरण देखील बदलते. अशावेळी करदात्याने बँक खात्यास रिव्हॅलिडेट करणे गरजेचे आहे. प्राप्तिकर खात्याने सोशल मीडियावर यासंदर्भात माहिती दिली आहे. ई फायलिंग पोर्टलवर रिफंडची प्रक्रिया सुलभपणे पार पाडली जावी यासाठी व्हॅलिडेशन स्टेट्स तपासण्याचेही निर्देश दिले आहेत.
बँक खाते व्हॅलिडेशन प्रक्रिया
करदाते बँक खात्याला ऑनलाईनवर व्हॅलिडेट करू शकतात. त्याची प्रक्रिया खूपच सोपी आहे. यासाठी प्राप्तिकर खात्याच्या संकेतस्थळावर जावे लागेल. तेथे युजर आयडी, पासवर्डच्या मदतीने लॉग- इन केल्यानंतर प्रोफाईलवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर बँक खात्याची निवड करून ‘रिव्हॅलिडेट’वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर खाते क्रमांक, आयएफएससी, खात्याचा प्रकार अपडेट केल्यानंतर ‘व्हॅलिडेट’वर क्लिक करावे लागेल.
नवीन बँक खाते जोडण्याची प्रक्रिया
नवीन खाते आयटीआरमध्ये नमूद करण्यासाठी प्राप्तिकर खात्याच्या संकेतस्थळावर जावे लागेल. प्रोफाईलवर क्लिक करा आणि नंतर माय बँक अकाऊंटवर क्लिक करा. आपल्याला अ‍ॅडेड, फेल्ड, रिमूव्हड बँक अकाऊंट असे टॅब दिसतील. नवीन खाते जोडायचे असेल, तर अ‍ॅड बँक अकाऊंट टॅबची निवड करावी लागेल. त्यानंतर व्हॅलिडेटवर क्लिक करा. म्हणजेच आपण कोणत्याही वेळी नवीन खाते आपल्या प्रोफाईलला जोडू शकता आणि जुने खाते डिलिट करू शकता. जुन्या खात्यालादेखील व्हॅलिडेट करता येते.