रेशन दुकानदारांचे कमिशन वाढवणार : खा. उदयनराजे
सातारा; Bharat Live News Media वृत्तसेवा : रेशन दुकानदारांचे कमिशन वाढीसाठी केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन खा. उदयनराजे भोसले यांनी जिल्हा रेशन दुकानदार संघटनेस दिले.
सातारा लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल खा.उदयनराजे भोसले यांचा सातारा जिल्हा रेशन दुकानदार संघटनेमार्फत जलमंदिर पॅलेस येथे जिल्हाध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील संघटनांच्या पदाधिकार्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रेशन दुकानदारांचे धान्य वाटपाचे कमिशन वाढवून मिळावे, यासाठी आपण केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी जिल्हा संघटनेमार्फत त्यांना विनंती करण्यात आली. याबाबत खा. उदयनराजे भोसले यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. दुकानदारांच्या कमिशन वाढीबाबत लवकरच केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन त्यांनी दिले. राज्य शासनामार्फत दुकानदारांना धान्य वाटपासाठी नवीन फोर-जी नेटवर्क असणारे पॉज मशीन देण्यात आली आहेत. या नवीन पॉज मशीनचे प्रातिनिधिक वाटप खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रेशन दुकानदार संघटनेचे पदाधिकारी बाळासाहेब सूर्यवंशी, गोविंद गंधाले, बबनराव देवरे, मधुकर पवार, संजय रजपूत, संजय गारोळे, संजय पवार, सागर साळुंखे उपस्थित होते.