खासदार पडोळेंचा गोंदियात छुपा दौरा; काँग्रेस पदाधिकारी नाराज
गोंदिया; Bharat Live News Media वृत्तसेवा : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुनील मेंढे यांना पराभूत करून काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे निवडणूक आले होते. त्यानंतर ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशिवाय रविवारी (दि.२३) प्रथमच गोंदियात आले. पडोळे यांनी गोंदयात पहिलाच दौरा छुप्या पध्दतीने केल्याने शहरातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज झाले आहेत.
आपल्या या छुप्या दौऱ्यात खा. प्रशांत पडोळे यांनी गोंदियातील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन यांची भेट घेऊन आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. तसेच काही खाजगी लोकानाही भेटले. त्यांच्या या दौऱ्याची जिल्ह्यातील कॉंग्रेस प्रदेश सचिव, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, तालुकाध्यक्षांसह काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना माहिती नव्हती. त्यामुळे नानाभाऊ हा कसला खासदार दिला. असे म्हणण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आली. तर काहींनी तसे माध्यमांपुढे बोलूनही दाखविले.
एखादा खासदार किंवा आमदार निवडणुकीत विजयी झाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या क्षेत्रात आल्यास त्यांचा जल्लोषात स्वागत केले जाते. त्यानुसार खासदार प्रशांत पडोळे यांचे गोंदिया येथे आगमन होताच त्यांच्या आगमनाचे जल्लोषात स्वागत सोहळा व्हायला हवा होते. जनतेचे आभार मानण्यासाठी यात्रा काढायला हवी होती, मात्र तसे काहीही झाले नाही. खासदार आले आणि गोंदियातून निघून गेल्याचे सोशल मीडियातील काही छायाचित्रांमध्ये दिसून आले. परिणामी त्यांच्या छूप्या दौऱ्यामुळे सर्वसामान्य जनता आणि काँग्रेस संघटनेत प्रचंड नाराजी वर्तविली जात आहे. हा नाराजीचा सूर पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बोलण्यातून दिसून आला.
खासदारांच्या दौऱ्याबाबत कल्पना नाही…
शनिवारी गोंदिया-भंडारा लोकसभेचे व आमच्या काँग्रेस पक्षाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे गोंदिया जिल्ह्यात आले. त्यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांची भेट घेऊन चर्चा केल्याची माहिती इतर माध्यमातून मिळाली. पण खासदारांनी गोंदिया जिल्ह्यात आले असता गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीला या बाबतची माहिती दिली नाही.
दिलीप बनसोड, जिल्हाध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटी, गोंदिया