USA vs ENG : अमेरिकेला ‘नाबाद’ हरवून इंग्लंड सेमीफायनलमध्ये
बार्बाडोस, वृत्तसंस्था : इंग्लंडने टी-20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर-8 च्या त्यांच्या शेवटच्या लढतीत अमेरिकेवर दणदणीत विजय मिळवून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. या सामन्यापूर्वी इंग्लंडचा नेट रनरेट हा 0.412 असा होता आणि वेस्ट इंडिज व दक्षिण आफ्रिका त्यांच्या पुढे होते. आता इंग्लंडने 4 गुणही कमावले आणि नेट रनरेटच्या (1.992) जोरावर उपांत्य फेरीतील स्थानही पक्के केले. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात उद्या होणारा सामना महत्त्वाचा असेल. आफ्रिका जरी 4 गुणांसह दुसर्या स्थानावर असली, तरी यजमान विंडीज दोन विजयासह नेट रनरेट सुधारून उपांत्य फेरीत जाऊ शकतात.
इंग्लंडने अमेरिकेला 115 धावांवर ऑल आऊट केले. आदिल राशीदने फिरकीचा चांगला मारा केला. ख्रिस जॉर्डनने हॅट्ट्रिक घेतली. अमेरिकेचे सलामीवीर स्टिव्हन टेलर (12 ) व अँड्रिस गौस (8) यांना 43 धावांवर इंग्लंडच्या गोलंदाजांनी माघारी पाठवले. नितीश कुमार (30) आणि कर्णधार अॅरोन जोन्स (10) यांना आदिल राशीदने त्रिफळाचीत केले. राशीदने 4-0-13-2 असा अप्रतिम स्पेल टाकला. हरमीत सिंग (21) याने चांगली फटकेबाजी करून कोरी अँडरसनला (29) साथ दिली. ख्रिस जॉर्डनने 19 व्या षटकात हॅट्ट्रिक घेताना अमेरिकेचा संपूर्ण संघ 115 धावांत तंबूत पाठवला. जॉर्डनने 2.5-0-10-4 असा स्पेल टाकला. सॅम कुरेनने दोन विकेटस् घेतल्या. अमेरिकेने 6 चेंडूंत 5 विकेटस् गमावल्या.
प्रत्युत्तरात जोस बटलर व फिल सॉल्ट यांनी पहिल्या 6 षटकांत 60 धावा चोपून नेट रनरेट प्रचंड सुधारण्याचा इरादा स्पष्ट केला. बटलरने आक्रमक फटकेबाजी करताना अर्धशतकही पूर्ण केले आणि इंग्लंडला 8.5 षटकांत 103 धावाही उभ्या करून दिल्या. इंग्लंडने हे लक्ष्य 18.4 षटकांत पार करून उपांत्य फेरीचे तिकीट पूर्ण करता येणार होते आणि त्याच निर्धाराने त्यांनी फटकेबाजी केली. 8 व्या षटकात बटलरने सलग 5 षटकार खेचले. इंग्लंडने 9.4 षटकांत बिनबाद 117 धावा करून विजय पक्का केला. जोस बटलर 38 चेंडूंत 6 चौकार व 7 षटकारांसह नाबाद 83 धावा केल्या, तर फिल सॉल्ट 21 चेंडूंत 25 धावांवर नाबाद राहिला.