चंद्रपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : नागभीडमधील मौशी गावात जादूटोणा केल्याच्या संशयावरून वृद्धाची हत्या करण्यात आली. या प्रकरणात जादूटोणा विरोधी कायद्यान्वये कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष ॲड. गोविंद भेंडारकर यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच नागभीड पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना याप्रकरणी निवेदन देण्यात आले.
नागभीड तालुक्यातील मौशी येथील ६७ वर्षीय आसाराम दोनाडकर यांची जादुटोण्याच्या संशयातून तिघांनी हत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि.२१) रात्री साडेआठच्या सुमारास घडली होती. जिल्ह्यात या प्रकरणामुळे खळबळ उडाल्यानंतर पोलिसांनी तिघां संशयितांना अटक केली. मौशी गावातील मैंद कुटुंबातील मोठ्या मुलाला मुलबाळ होत नव्हते. तसेच घरातील इतर सदस्य हे नेहमी आजारी राहायचे. त्यामुळे आसाराम दोनाडकर यांच्यावर जादूटोणा केल्याचा संशय घेतला जात होता. याच प्रकरणातून हे हत्याकांड घडले. या दुर्दैवी घटनेची अखिल भारतीय अंधश्रद्धा समितीने दखल घेत असून गावात व मृत आसाराम दोनाडकर यांच्या घरी भेट दिली. गावात अनेक ठिकाणी भेटी घेऊन प्रबोधन केले. तसेच या जादुटोणा प्रकरणाची सखोल चौकशी करून जादूटोणा विरोधी कायद्यान्वये कारवाई करावी, असे निवेदन पोलिस निरीक्षकांना देण्यात आले. यावेळी या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सहसचिव अनिल लोणबले, ब्रम्हपुरी ता. संघटक प्रा. बालाजी दमकोंडावार , मानसोपचार तज्ज्ञ ब्रम्हपुरी डॉ. शशिकांत बांबोडे , सेवानिवृत्त शिक्षक भाऊराव राऊत, यश कायरकर, जिवेश सयाम,नितीन भेंडाळे यांची उपस्थिती होती.
चंद्रपूर : जादूटोणा विरोधी कायद्याची अंबलबजावणी करा; ‘अनिस’ची मागणी