नागपूर: उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते १ हजार ९१० आशा सेविकांना मोबाईल फोनचे वितरण
नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्ह्यातील 13 तालुक्यातील प्रत्येकी एका आशा स्वयंसेविकेला प्रातिनिधिक स्वरूपात आज (दि.२३) मोबाईल फोनचे वितरण करण्यात आले. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने जिल्हयातील ग्रामीण भागात कार्यरत १ हजार ९१० आशा सेविकांना या मोबाईल फोन सुविधेच्या माध्यमातून आता अधिक सक्षम केले जात आहे.
ग्रामीण भागातील आशा सेविका या आरोग्य विभागाचा कणा आहेत. आधुनिक युगात आता शासकीय कामकाजाशी निगडीत अनेक अहवाल, लाभार्थी नोंदणी हे ऑनलाईन पद्धतीने तथा ॲप्लिकेशनच्या माध्यमातून करणे क्रमप्राप्त झाले आहे. या कामांमध्ये आशांना तत्परतेने काम करण्यास मदत होण्याच्या दृष्टीने त्यांना आधुनिक अँड्राईड मोबाईल देण्यात येत आहेत. प्रधानमंत्री मातृवंदन योजना, यू विन पोर्टल, आयुष्यमान भारत ई-कार्ड, आभा कार्ड तसेच अन्य ऑनलाईन कामे आता आशांना या मोबाईलच्या मदतीने करणे सुलभ होईल. यासाठी खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत सुमारे १ कोटी ९० लक्ष ९८ हजार ९० रूपये निधी आरोग्य व्यवस्थापन सुविधेसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.
नागपूर जिल्हयातील सावनेर, कळमेश्वर, मौदा, कामठी, हिंगणा, नागपूर, पारशिवनी, रामटेक, उमरेड, कुही, भिवापूर, नरखेड व काटोल या 13 तालुक्यात आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातुन कामांना गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. देवगिरी या शासकीय निवासस्थानी यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमास आमदार टेकचंद सावरकर, आ. आशिष जायसवाल, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा
नागपूर : माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या पुरस्काराचे वितरण
नागपूर : वृद्ध दाम्पत्याने गळफास घेऊन जीवन संपवले
कुठे आहेत राहुल गांधी आणि खर्गे? तामिळनाडू विषारी दारु प्रकरणी निर्मला सीतारामण यांचा सवाल