काळाराम मंदिर पत्रकप्रकरणी फडणवीसांचा खुलासा
नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : नाशिक काळाराम मंदिर परिसरातील रहिवाशांना धमकी देणारे, निळे झेंडे लावू नका, अशा पत्रक प्रकरणी पोलिसांनी वेळीच वास्तव पुढे आणल्याने संभाव्य दंगल सदृश्य स्थिती टाळता आली. यापुढेही अशा घटना होऊ नयेत, यासाठी आम्ही अलर्ट असून डिजी, एसआयडीशी बोलणे झाले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (दि.२३) माध्यमांशी बोलताना दिली.
फडणवीस म्हणाले, काळाराम मंदिराच्या आसपास राहणाऱ्या लोकांना धमकी देणारे पत्र काढण्यात आले होते. ते पत्र पब्लिश करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. दुसऱ्या व्यक्तीशी असलेल्या वैमनस्यातून हे दलित समाजाला धमकी देणारे ते पत्र होतं. विशेष म्हणजे हे पत्रक काढणाराही अनुसूचित जातीचाच आहे. त्यामागे काय कारण आहे, हे शोधून काढले आहे. त्याच्याकडे चार मोबाईल दोन लॅपटॉप मिळून आले. यापाठीशी कोण आहे. दंगल घडवण्यासाठी त्याने हे पत्रक काढले आहे का? ज्याच्या नावाने पत्र काढलं, त्याच्याशी त्याचे वैर असल्याचे, बदनाम करण्यासाठी त्यांनी पत्र काढल्याचे बोलले जात असल्याने या प्रकरणात नाशिक पोलीस सगळ्या बाबींची चौकशी करीत आहेत. त्या संदर्भात पूर्णपणे माहिती पोलिसांनी काढलेली आहे.
मन दुषित करून कायदा सुव्यवस्था निर्माण होणारी परिस्थिती टळली आहे. हे पत्र काढून पत्र सोशल मीडियावर टाकायचे आणि लोकांमध्ये गैरसमजुती निर्माण करून दंगा घडवण्याचे प्रयत्न यापुढेही होऊ शकतात. काही राजकीय नेत्यांनी हे पत्र ट्विट केलं. अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये शहानिशा न करता वस्तुस्थिती न तपासता तसे पत्र व्हारल केल्यास समाजात तेढ निर्माण होईल, असेही गृहमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.