जनतेच्या पाठबळामुळेच जिल्ह्याचे नेतृत्व सिद्ध करू शकलो: हसन मुश्रीफ
मुदाळतिट्टा, Bharat Live News Media वृत्तसेवा: मागील २५ वर्षे जनतेने मला तळहाताच्या फोडाप्रमाणे जीवापाड जपले. लोकसेवेसाठी पुन्हा एकदा मला आशीर्वाद द्या, अशी भावनिक साद पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घातली. तुम्ही जे- जे काम हातामध्ये सोपविले, ते- ते प्रामाणिकपणे तडीस नेण्याचा मी प्रयत्न केला. तुमच्या आशीर्वाद आणि भरभक्कम पाठबळामुळेच जिल्ह्याचे नेतृत्व सिद्ध करू शकलो, असे प्रतिपादन पालक मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
यमगे (ता. कागल) येथे साडेसहा कोटींच्या विकासकामांच्या लोकार्पण व शुभारंभ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी संघाचे अध्यक्ष प्रवीणसिंह पाटील होते. यावेळी शिष्यवृत्ती परीक्षा यशस्वी विद्यार्थी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले की, गोरगरिबांच्या समस्या सोडवण्याची तळमळच मला स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळेच जनतेचे प्रश्न घेऊन मी पहाटे पाच वाजल्यापासून कार्यरत राहतो. सर्व निकषात बसत असेल, तर मला मते द्या. विकासकामात कमी पडलो असेल, तर मला मते देऊ नका, असेही ते म्हणाले. तुम्हाला ठेच लागली तर कळ मला येते. जनतेने मला आपल्या कुटुंबातील आपला भाऊ मुलगा म्हणून जपले. विरोधकांच्या खोट्या प्रचारास बळी पडू नका. सरळ मला फोन करा. मला जाब विचारा. तुमच्या विश्वासास पात्र ठरलो नाही तर एक क्षणसुध्दा मी राजकारणात राहणार नाही.
केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने म्हणाले, विधवा, परितक्त्या, निराधार माता -भगिनी जगणं सोपं नव्हते. पेन्शनवाढीमुळे त्यांच्या जगणं सोपं झालं. माता भगिनी मुश्रीफ यांच्या कार्याची जाण कायम ठेवतात म्हणूनच त्यांचा आशिर्वादामुळेच मुश्रीफ यांची राजकीय कारकीर्द यशस्वी आहे.
रत्नाप्पाण्णा आणि मुश्रीफ..!
शेतकरी संघाचे अध्यक्ष प्रवीणसिंह पाटील म्हणाले, गोरगरिबांच्या कामासाठी जुन्या काळात स्वर्गीय रत्नाप्पाण्णा कुंभार आणि आत्ता मंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव घेतले जाते. भविष्यकाळाचा वेध घेण्यासाठी त्यांच्या पाठीशी एकदिलाने आणि ठामपणे राहूया. पंचवीस वर्षे सुरू असणाऱ्या तालुक्याच्या प्रगतीत खंड पडू नये, यासाठी मुश्रीफ यांनाच पुन्हा विधानसभेत पाठवायचा निर्णय लोकांनी केला आहे.
गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, प्रवीणसिंह पाटील, जिल्हा बँक संचालक भैया माने, ॲड. जीवनराव शिंदे , बिद्रीचे संचालक सुनीलराज सूर्यवंशी, रावसो खिलारी, रंगराव पाटील, मनोज फराकटे, विकास पाटील, रणजित सूर्यवंशी, रणजित मुडूकशिवाले, किरण पाटील, राजू हुल्ले, निलेश शिंदे, दत्तात्रय पाटील, सरपंच प्रमिला पाटील, उपसरपंच ज्योती लोकरे, राजू सावंत, दगडू किल्लेदार, जयसिंग पाटील, विजय कुंभार, जयसिंग पाटील, दत्ता पाटील, रणजीत पाटील, विजय हुल्ले आदी उपस्थित होते.
माजी सरपंच शिवाजीराव पाटील यांनी स्वागत केले. दिलीपसिंह पाटील यांनी प्रास्ताविक केले. अनिल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. विशाल पाटील यांनी आभार मानले.
हेही वाचा
कोल्हापूर : शिरढोण येथे अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार; २ जण गंभीर जखमी
कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा आज ऑरेंज अलर्ट
कोल्हापूर: ‘बिद्री’च्या इथेनॉल प्रकल्पावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड