…तर मुस्लिमांनाही ओबीसीतूनच आरक्षण द्या: मनोज जरांगे
छत्रपती संभाजीनगर, Bharat Live News Media वृत्तसेवा : मुस्लीम समाजाच्याही कुणबी सरकारी नोंदी निघाल्या आहेत. लिंगायत, मारवाडी, ब्राह्मण, लोहार समाजाच्याही कुणबी नोंदी निघाल्या आहेत. मग मुस्लिमांनाही ओबीसीतूनच आरक्षण मिळायला पाहिजे. त्यांच्यावरही अन्याय व्हायला नको. आता जे कायद्याने बोलायचे ते कायद्याने बोला, अशी मागणी राज्य सरकारकडे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी केली. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करा, अन्यथा विधानसभेला गुलाल रुसेल, असा इशारा त्यांनी दिला. जरांगे यांनी रविवारी (दि.२३) रुग्णालयात माध्यमांशी संवाद साधला.
जरांगे पुढे म्हणाले, मुस्लिमांच्या नोंदी कुणबी म्हणून झाल्या असतील तर राज्यातील सर्व मुस्लिमांना कुणबी म्हणून ओबीसीतून आरक्षण दिले पाहिजे. ते आरक्षण कसं देत नाही तेच मी, बघतो. सरकारने कायद्याप्रमाणे विचार करून सडेतोड भूमिका घेणे गरजेचे आहे. मराठवाड्यातला मराठा समाज हा कुणबी आहे, त्याचे रेकॉर्ड आहे. मात्र ते तपासले जात नाही ते तात्काळ तपासायला सुरुवात करा, असे जरांगे म्हणाले.
या देशात आणि राज्यात फक्त मराठ्यांच्या सरकारी नोंदी आहेत. त्यामुळे मराठ्यांना १३ जुलैच्या आत आरक्षण देणे सरकारला बंधनकारक आहे. १९६७ नंतर आरक्षणात समाविष्ट केलेल्या जातीच्या नोंदी नाहीत. मग कशाच्या आधारे तुम्ही त्यांना १६ टक्के आरक्षण दिले. आमच्या पाठीत खंजीर खुपसून दिले ना? इतके दिवस आम्ही भाऊ म्हणून वागलो. तुम्ही प्रत्येक वेळी आमच्या ताटात विष कालवायचं काम करत आला आहात. असा घणाघात जरांगे यांनी सरकारवर केला. माळी समाजाला व्यवसायाच्या आधारावर आरक्षण दिले असेल तर आम्हीदेखील तुम्हाला आमचे व्यवसाय दाखवतो. मग त्यांना आरक्षण कसे दिलं? याच आम्हाला उत्तरं द्या, असा प्रश्न देखील जरांगे यांनी केला.
भुजबळांवर जोरदार टीका
ज्यांनी बोटाला धरून मोठं केलं, ज्यांचं देशात हिंदुहृदयसम्राट पद होत. त्यांना तुम्ही अटक केली. ज्यांनी तुमच्यासाठी १६ टक्के आरक्षण दिलं, आमचं वाटोळ केलं त्यांचा पक्ष मोडून आले. आता भाजपच्या नादी लागले, तुम्ही दिलबऱ्या नाही तर गोंधळ्या आहात. अशी जोरदार टीका मंत्री छगन भुजबळांवर जरांगेंनी केली.
घटनेत दिलेले आरक्षण सोडून इतर आरक्षण रद्द करा
कसल्याही नोंदी नसतानाही बेकायदेशीर आणि बोगस आरक्षण ज्यांना दिले ते तुम्ही कायदेशीर म्हणतायेत. मग डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत दिलेले आरक्षण सोडून इतर आरक्षण रद्द करून टाका. या लोकांना दिलेले १६ टक्के आरक्षण रद्द करा, अन्यथा विरोधात आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा जरांगे यांनी सरकारला दिला.
नावानुसार कोणत्याच मतदारसंघाची पाहणी नाही
फक्त मतदारसंघाची चाचपणी केली. मला खोटं बोलता येत नाही. आम्ही कोणत्याही मतदारसंघाचे नाव घेतले नाही,
आणि घेणारही नाही. कारण राजकारणात आम्हाला जायचं नाही, तो आमचा मार्ग नाही. सरकारने आमच्या मागण्या १३ जुलैपर्यंत मान्य कराव्या. अन्यथा २८८ उमेदवार उभे करायचे की, पाडायचे ते आम्ही, समाजाच्या बैठकीत ठरवू असा इशारा त्यांनी दिला.
नोंदी सापडल्यात, मग मार्गदर्शन का मागताय?
जरांगे म्हणाले, आमच्या ज्या नोंदी आहेत, त्यांचे पुरावे उपलब्ध आहेत. ते पुरावेही स्वीकारलेले नाहीत. बीड जिल्ह्यात २० हजार नोंदी सापडल्या आहेत. तरीही त्यावर मार्गदर्शन मागितलं जातं आहे. उर्दू भाषेत जराहत म्हटलं आहे. ज्याचा अर्थ शेतकरी असा होतो.
हेही वाचा
आंदोलन सरकार पुरस्कृत; मनोज जरांगे यांचा हाकेंवर आरोप
जालना : मनोज जरांगे यांचे आंदोलन अंतरवालीतच हाेणार, ग्रामसभेकडून शिक्कामोर्तब
..तर विधानसभेच्या सर्व जागा लढविणार : मनोज जरांगे पाटलांचा निर्धार