रिंगरोडबरोबरच विकासही मंदावला; प्रशासनाची ढिलाई कारणीभूत
पिंपरी : Bharat Live News Media वृत्तसेवा : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) वतीने विकसित करण्यात येत असलेल्या रिंग रस्त्याचे काम सध्या संथगतीने सुरू आहे. रस्त्याचे सध्या केवळ पहिल्या टप्प्याचेच काम सुरू आहे. त्यामुळे या रस्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांचा हिरमोड होत आहे. प्रशासनाची ढिलाई त्याला कारणीभूत ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
साडेसहा वर्षांपूर्वीच या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली. सध्या पहिल्या टप्प्यामध्ये सोळू ते वडगाव शिंदे या 4.70 किलोमीटर अंतरातील रस्त्याचे काम केले जाणार आहे. त्यासाठी अंदाजे 400 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या रस्त्याचा भूसंपादन प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केलेला आहे. रस्त्याच्या कामासाठी सविस्तर अंदाजपत्रक तयार केलेले आहे. या रस्त्यासाठी पीएमआरडीएची भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे; मात्र प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. या रिंग रस्त्यामुळे 40 गावे जोडली जाणार आहेत, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.
साडेसात वर्षांपूर्वीच प्रशासकीय मान्यता
रिंगरस्त्याच्या कामासाठी पीएमआरडीएकडून 28 डिसेंबर 2016 मध्येच 17 हजार 412 कोटी रुपयांची मूळ प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. ही मंजुरी मिळून साडेसात वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. मे-2023 मध्ये त्यासाठी 14 हजार 200 कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. रिंगरस्त्याच्या कामाबाबत पीएमआरडीएची भूमिका जाणून घेण्यासाठी मुख्य अभियंता अशोक भालेकर यांच्याशी वारंवार संपर्क साधला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
काम टप्पानिहाय
पीएमआरडीएकडून साकारणार्या रिंगरस्त्याच्या कामाचे टप्पानिहाय नियोजन करण्यात आलेले आहे. सोळू येथून सुरू होणारा हा रिंग रस्ता एकूण 128 किलोमीटर लांबीचा आहे. त्यातील परंदवाडी ते सोळू या 40 किलोमीटर अंतरातील रस्त्याचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाकडून करण्यात येत आहे. वाघोली ते लोहगाव येथील 5.70 किलोमीटर रस्त्याचे काम पुणे महापालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे. तर, पीएमआरडीएकडून एकूण 83.12 किलोमीटर अंतरातील रस्त्याचे काम केले जाणार आहे. हा रस्ता पीएमआरडीए हद्दीत सुरुवातीला 110 मीटर रुंद करण्यात येणार होता. मात्र, नागरिकांच्या विरोधामुळे तो सध्या 65 मीटर रुंद होणार आहे.
…असा असेल रस्ता
रिंगरस्त्याच्या पहिल्या टप्प्यात सोळू ते वडगाव शिंदे हे काम होईल. त्यानंतर वडगाव शिंदे-लोहगाव-वाघोली हे काम पुणे महापालिकेकडून केले जाणार आहे. पीएमआरडीएकडून वाघोली येथून पुणे-अहमदनगर रस्त्याने पुणे-सोलापूर रस्त्यापर्यंत (कदमवाक वस्तीपर्यंत) काम केले जाईल. त्यानंतर पुणे-सोलापूर रस्ता ते पुणे-सासवड रस्ता (वडकी), पुणे-सासवड रस्ता ते नवीन पुणे-सातारा रस्ता (दरी पुलाजवळ) असे काम पूर्ण केले जाणार आहे. पुढे वारजे-भूगाव-बावधन-सूस-हिंजवडी एमआयडीसी-परंदवाडी असा रिंगरस्ता असणार आहे. परंदवाडी ते सोळू हे 40 किलोमीटर अंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने विकसित केले जाणार आहे. या रस्त्यावर 15 उड्डाणपूल, दोन लोहमार्गावरील उड्डाणपूल आणि पाच बोगदे प्रस्तावित आहेत.
रस्त्यास होणार्या विलंबाचे परिणाम
रिंगरस्त्याला विलंब होत असल्याने अन्य शहरांतून पुण्यात येणारी अवजड वाहनांची वाहतूक वळविण्यात अडचणी येत आहेत.
रिंगरस्ता होत नसल्याने 40 गावांतील नागरिक त्रस्त आहेत.
मोठ्या-मोठ्या गृहप्रकल्पांकडून रिंगरोड जाणार असल्याचे केले जाणारे दावे फोल ठरत आहेत.
रिंगरस्ता होणार या अपेक्षेने या रस्त्याच्या बाजूने होणार्या विकासकामांचा वेग मंदावला आहे.