पांढर्‍या शिधापत्रिकाधारकांना 5 लाखांचे आरोग्य कवच

पांढर्‍या शिधापत्रिकाधारकांना 5 लाखांचे आरोग्य कवच

पिंपरी : Bharat Live News Media वृत्तसेवा : शहरातील 43 हजार 605 शुभ्र (पांढरे) शिधापत्रिका असणार्‍या कुटुंबीयांना दरवर्षी 5 लाख रुपयांचे आरोग्य कवच मिळणार आहे. राज्य सरकारने नव्याने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभ त्यांना मिळेल. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 26 फेब्रुवारी 2019 च्या शासन निर्णयानुसार महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांची सांगड घालून त्या राज्यामध्ये एकत्रितपणे राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. यापूर्वी केशरी शिधापत्रिका आणि अंत्योदय शिधापत्रिका असणार्‍या रेशनकार्डधारकांनाच या योजनेचा लाभ मिळत होता. आता पांढरी शिधापत्रिका असणार्‍या नागरिकांनाही या योजनेचा लाभ देण्याचा शासन निर्णय नव्याने जारी करण्यात आलेला आहे.
शिधापत्रिका आधारकार्डशी लिंक करणे आवश्यक
पांढरी शिधापत्रिका असणार्‍या कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देण्यासाठी आयुष्मान कार्ड निर्माण करण्यासाठी संबंधित शिधापत्रिका आधारकार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे. त्याची कार्यवाही सुरू करण्यात यावी, असे आदेश राज्यातील सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी, सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी, सर्व उपनियंत्रक (शिधावाटप, मुंबई) यांना अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने देण्यात आले आहेत.
शहरामध्ये पांढरी शिधापत्रिका असणार्या कार्डधारक कुटुंबियांची संख्या 43 हजार 605 इतकी आहे. त्यामध्ये कार्डनुसार लाभार्थी संख्या 87 हजार 921 इतकी आहे. योजनेनुसार प्रति कुटुंब दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत आरोग्य संरक्षण मिळणार आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये 996 तर, प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमध्ये 1209 उपचारांचा समावेश आहे. आता दोन्ही योजनांमध्ये 328 उपचारांची वाढ झाली आहे. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतही 147 उपचारांची वाढ करुन ही संख्या आता 1356 इतकी करण्यात आली आहे.

शासन निर्णयानुसार, पांढरे रेशनकार्ड असणार्‍या कार्डधारकांनादेखील महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, हा लाभ घेण्यासाठी पांढरे रेशनकार्ड हे आधार कार्डला लिंक असणे गरजेचे आहे.
– डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, यशवंतराव चव्हाण रुग्णालय पदव्युत्तर संस्था, संत तुकारामनगर-पिंपरी

हेही वाचा

जळगाव : जिल्ह्यातील रेल्वे प्रश्न येत्या दोन-तीन महिन्यात मार्गी लागणार : गिरीश महाजन
13 वर्षांपूर्वी त्सुनामीत गेलेल्या पत्नीचा मृतदेह ‘तो’ आजही शोधतोय
आमदार मंगेश चव्हाण यांना पोलीस स्टेशन समोर पिस्तुलीने गोळी घालण्याची धमकी