एनटीएमध्ये मोठा बदल; सुबोध कुमारांच्या जागी प्रदीप सिंग नवीन महासंचालक
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : देशभरात झालेल्या ‘नीट’ आणि ‘नेट’ परिक्षांमधील गैर- व्यवहारानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे महासंचालक सुबोध कुमार यांना पदावरून हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी निवृत्त आयएएस प्रदीप सिंह खरोला हे एनटीएचे नवीन महासंचालक असतील. प्रदीप सिंह खरोला हे कर्नाटक कॅडरचे आयएएस राहिले आहेत. नुकत्याच झालेल्या ‘नीट’ पेपरफुटी आणि ‘नेट’ परीक्षेच्या गैरव्यवहारानंतर राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या कार्यप्रणालीवर सतत प्रश्न उपस्थित केले जात होते. याप्रकरणी आता सरकारने मोठी कारवाई केली आहे.
प्रवेश परीक्षा गैरव्यवहारापासून मुक्त व्हाव्यात म्हणून एनटीएची स्थापना करण्यात आली आहे. परंतु, एनटीएचे मॉडेल पुन्हा पुन्हा अपयशी ठरत आहे. विज्ञान शाखेची नेट ही परीक्षा 25 ते 27 जून दरम्यान होणार होती. परीक्षा पुढे ढकलण्याचे कारण साधनांची कमतरता असल्याचे सांगण्यात आले आहे.
एनटीएच्या स्थापनेपासूनच संशयाच्या घेऱ्यात
एनटीएची स्थापना 2018 मध्ये झाली, परंतु स्थापनेपासून प्रत्येक वर्षी परीक्षेत अनियमितता आणि हेराफेरीचे आरोप होत आहेत. 2019 मध्ये जेईई मेन परिक्षसाठी विद्यार्थ्यांना तांत्रिक बिघाडामुळे समस्यांना सामोरे जावे लागले होते. याशिवाय काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका उशिरा आल्याच्या तक्रारीही केल्या होत्या. 2020 मध्ये झालेल्या नीट प्रवेश परीक्षामध्ये एनटीएवर गंभीर प्रश्न उपस्थित केले गेले होते. त्यामुळे अनेकवेळा परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या. या परीक्षेत अनियमिततेच्या अनेक तक्रारी आल्या होत्या.
यावर्षी नीट परीक्षेतही अनियमिततेच्या तक्रारी आल्या होत्या. यासोबतच नीट परीक्षेबाबत देशभरात खळबळ उडाली आहे. ग्रेस मार्क्सबाबत विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. त्याचवेळी बिहारमध्ये पेपरफुटीचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे एनटीएची विश्वासार्हता आणि पारदर्शकता यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
18 जून रोजी झालेली ‘नेट’ परीक्षाही रद्द करण्यात आली आहे. यूजीसीला गृह मंत्रालयाकडून पेपर फुटल्याची माहिती मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. अशाप्रकारे एनटीएच्या स्थापनेच्या 6 वर्षात 2018 आणि 2023 मध्ये केवळ दोनदा पेपरफुटी आणि अनियमिततेच्या तक्रारी आल्या नाहीत, अन्यथा एनटीएच्या स्थापनेनंतर जवळपास प्रत्येक वर्षी परीक्षेला प्रश्नांनी घेरले आहे.
हेही वाचा :
Neet Exam : ३२ लाखांना विकला गेला ‘नीट’चा पेपर!
NEET EXAM 2024 : ‘नीट’च्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती गठित करणार; शिक्षणमंत्र्यांची घोषणा
‘नीट’वरून भाजपचे राहुल यांच्यावर टीकास्त्र