आमदार बच्चू कडू यांच्या जीवाला धोका, ग्रामीण पोलीस अधीक्षकांना पत्र
अमरावती, Bharat Live News Media वृत्तसेवा माझ्या जीवाला धोका आहे, असं पत्र प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षकांना दिले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे आपल्या जीवाला धोका असल्याचं बच्चू कडूंनी पत्रात म्हटलं आहे. त्यामुळे या पत्राने एकच खळबळ उडाली आहे.
मी अमरावतीतून बाहेर गेल्याबरोबर घरच्यांना, कार्यकर्त्यांना व जवळच्या नागरिकांना माझा अपघात झाला, असे फोन येत आहेत. अपघात झाल्याची अफवा पसरविली जात असल्याने याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी बच्चू कडू यांनी एसपी विशाल आनंद यांच्याकडे केली आहे.
सध्या बच्चू कडू यांना वाय प्लस सुरक्षा आहे. मात्र त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना अपघाताचे फोन जात आहेत. त्यामुळे बच्चू कडूंच्या जीवाला धोका असल्याने खळबळ उडाली आहे.
पत्रातील ठळक मुद्दे :
बच्चू कडू यांनी ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांना दिलेल्या पत्रात गोपनीय माहितीनुसार मला संदेश मिळाले असल्याचे सांगण्यात आले. त्यामध्ये, मी शिंदे साहेबांचा कट्टर कार्यकर्ता आहे. मी गडचिरोली येथे राहतो. माझे नक्षलवाद्यांशी नजीकचे संबंध आहेत. बच्चू कडूला पाहून घेऊ. बच्चू कडू म्हणजे काहीच नाही, बच्चू कडूला पाहून घेऊ, अशी धमकी देण्यात आल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू यांना निनावी फोन येत आहेत. भाऊ तुमचा अपघात झाला आहे का? तुमची तब्येत कशी आहे? असे काही प्रश्न फोनवरून विचारले जात आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आमदार बच्चू कडू यांनी केली आहे.
बच्चू कडू हे आक्रमक लोकप्रतिनिधी म्हणून ओळखले जातात. अनेक मुद्द्यांवर ते आपली जाहीर भूमिका आक्रमकपणे मांडत असतात. यापूर्वी देखील त्यांना धमक्या देण्यात आलेल्या आहेत. मात्र आता त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना, घरच्यांना बच्चू कडूचा अपघात झाला असे निनावी फोन येत असल्यामुळे याच्या मागे कोण आहेत? असा सवाल उपस्थित होत आहे. हा प्रकार एकदा किंवा दोनदा नव्हे तर अनेकदा झाल्यामुळे बच्चू कडू यांनी यासंदर्भात आज ग्रामीण पोलीस अधीक्षकांना पत्र देऊन सखोल चौकशीची मागणी केली आहे.
हेही वाचा :
तरुणांच्या नैराश्यात वाढ; टेलिमानस सेवेद्वारे 80 हजारांपेक्षा अधिक जणांवर उपचार
एकनाथ खडसेंनी घेतली अमित शहांची भेट, भाजपमध्ये प्रवेश करणार?
केजरीवालांना मोठा धक्का, हायकोर्टात सुनावणी पूर्ण होईपर्यंत जामीन स्थगित