तरुणांच्या नैराश्यात वाढ; टेलिमानस सेवेद्वारे 80 हजारांपेक्षा अधिक जणांवर उपचार
दीपेश सुराणा
पिंपरी : Bharat Live News Media वृत्तसेवा : मोबाईलच्या अतिआहारी गेलेली तरुणाई, तारुण्यात विरुद्धलिंगी व्यक्तीविषयी वाटणारे आकर्षण आणि त्यातून करिअरकडे होणारे दुर्लक्ष, व्यसनांच्या आहारी जाऊन स्वतःवरील नियंत्रण हरवून बसणे अशा विविध मानसिक समस्यांनी तरुण नैराश्याच्या गर्तेत जात असल्याचे निरीक्षण केंद्र सरकारच्या टेलिमानस दूरध्वनी सेवेच्या माध्यमातून काम करणार्या काही समुपदेशकांनी नोंदविले आहे.
या सेवेचा गेल्या दोन वर्षांमध्ये 80 हजारांपेक्षा अधिक जणांनी लाभ घेतला आहे. त्यामध्ये तरुणांचे प्रमाण मोठे आहे. तरुणांबरोबरच छोट्या-मोठ्या कारणांनी निराश होणार्या व्यक्तींचे समुपदेशन करून त्यांना नैराश्येतून बाहेर काढण्याचे काम या सेवेच्या माध्यमातून होत आहे. टेलिमानस – ‘मनोविकारावरील दूरध्वनीद्वारे सल्ला’ ही सेवा राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमाचा एक भाग आहे. 10 ऑक्टोबर 2022 पासून या सेवेला सुरुवात झाली. या सेवेचा भ्रमणध्वनीद्वारे लाभ घेण्यासाठी 14416 तर, लँडलाईनसाठी 18008914416 हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
महाराष्ट्रात ही सेवा एकूण 4 केंद्रांच्या माध्यमातून सुरू आहे. त्यामध्ये ठाणे, पुणे आणि अंबेजोगाई (बीड) येथील केंद्रांचा खर्च केंद्र सरकारमार्फत करण्यात येतो. तर, नागपूर येथील केंद्र सीएसआरअंतर्गत आदित्य बिर्ला ग्रुपच्या माध्यमातून चालविण्यात येत आहे. या टोल फ्री क्रमांकाच्या माध्यमातून क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, सायक्याट्रिक नर्स आणि सायक्याट्रिक सोशल वर्कर समुपदेशनाचे कार्य करीत आहे. या सेवेसाठी मनोविकृतीतज्ज्ञदेखील नियुक्त केलेले आहेत. प्रत्येक केंद्रावर एकूण 20 जणांचे पथक त्यासाठी नियुक्त केले आहे.
तरुणांनी समुपदेशकांकडे कॉलद्वारे मांडलेल्या समस्यांची काही उदाहरणे
१.
24 वर्षीय युवकाला अभ्यासामध्ये एकाग्रतेचा अभाव जाणवत होता. त्याला मोबाईलचे व्यसन लागले होते. याबाबत त्याने टेलिमानसवर संपर्क साधला. त्याची भावनिक स्थिती तसेच त्याला जाणवणार्या समस्येचे स्वरुप समजून घेतल्यानंतर लक्षात आले की तो दिवसातून दहा ते अकरा तास मोबाईलचा वापर करीत होता. विविध सोशल मीडिया साईट पाहण्यासाठी तो एवढा वेळ वाया घालवत होता. त्याला मोबाईलच्या अतिवापराने होणारे दुष्परिणाम सांगण्यात आले. तसेच स्क्रीन टाईम कसा हळूहळू कमी करता येईल, याविषयी समुपदेशकाने मार्गदर्शन केले. दूरध्वनीद्वारे 3 सत्र घेऊन या तरुणाला मोबाईलचा वापर कमी करण्यासाठी परावृत्त करण्यात यश मिळाले. त्यामुळे तो मोबाईलच्या व्यसनातून बाहेर पडला.
२.
एका 27 वर्षीय तरुणाची कोवीडच्या काळात नोकरी गेली. त्यामुळे आलेल्या नैराश्यातून तो दारूच्या आहारी गेला होता. त्याने टेलिमानसवर संपर्क साधल्यानंतर त्याला ध्यानधारणा तसेच मानसिक आधार देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच, आवश्यक औषधोपचार घेण्यास सांगितले. त्यानंतर त्याची समस्या दूर झाली.
३.
तारुण्यात विरुद्धलिंगी व्यक्तीविषयी वाटणार्या आकर्षणाच्या आहारी गेलेल्या एका तरुणाची मानसिक स्थिती खालावली होती. त्याला करिअर निवडता येत नव्हते. तो भावनिकदृष्टया असंतुलित झाला होता. तसेच, त्याला मोबाईलचेही व्यसन लागले होते. या तरुणाने टेलिमानसवर संपर्क साधल्यानंतर त्याला समुपदेशकांनी करिअरविषयी मार्गदर्शन केले. त्याचा फायदा झाल्याने हा तरुण नैराश्यातून बाहेर पडला.
टेलिमानसवर येणार्या कॉलचे स्वरूप
दहावी, बारावीसह विविध परीक्षांमध्ये मिळालेले कमी गुण, अभ्यासाचा वाटणारा ताण, सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमानुसार स्वतःला सामावून घेण्यात येणार्या अडचणी, मोबाईल फोनचे लागलेले व्यसन अशा विविध कारणांसाठी प्रामुख्याने 16 ते 24 वयोगटापुढील विद्यार्थ्यांचे कॉल येतात. तर, 25 वयोगटांपुढील तरुणांमध्ये प्रामुख्याने करिअरची वाटणारी चिंता, पती-पत्नींमधील विसंवाद, नातेसंबंधांतील ताणतणाव आदींशी संबंधित कॉल येतात, अशी माहिती टेलिमानसवर कार्यरत महिला समुपदेशकाने दिली.
विद्यार्थ्यांना दहावी-बारावीच्या अभ्यासाचा जाणवणारा तणाव, करिअरविषयी वाटणारी चिंता, अभ्यासासाठी लागणार्या एकाग्रतेचा अभाव, व्यसनांतून हवी असलेली मुक्ती, मोबाईलचे लागलेले व्यसन, मानसिक आजार, झोप न येणे, आत्महत्येचे विचार अशा विविध कारणांसाठी प्रामुख्याने टेलिमानसवर 30 टक्के कॉल येतात. त्यांना मार्गदर्शन करून नैराश्यापासून परावृत्त केले जाते.
– बिभीषण काटकर, समुपदेशक, अंबेजोगाई केंद्र, टेलिमानस.
टेलिमानस ही दूरध्वनी सेवा देशभरात उपलब्ध आहे. महाराष्ट्रात 4 केंद्रांच्या माध्यमातून ही सेवा दिली जात आहे. दूरध्वनीद्वारे या सेवेवर संपर्क साधल्यानंतर किमान 15 ते 20 मिनिटे समोरची व्यक्ती, विद्यार्थ्यांशी समुपदेशक संवाद साधतात. ज्यांनी कॉल केला असेल त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला जातो. तसेच, त्यांचे समुपदेशन करून त्यांना नैराश्यातून बाहेर काढले जाते. आतापर्यंत राज्यात 80 हजारांपेक्षा अधिक जणांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.
– डॉ. स्वप्नील लाळे, अतिरिक्त संचालक, मानसिक आरोग्य (मुंबई), आरोग्य
हेही वाचा
AUS vs BAN : पॅट कमिन्सची हॅटट्रिक; डकवर्थ लुईसने ऑस्ट्रेलिया विजयी
सूर्यकुमारचा झंझावात, विराटच्या ‘त्या’ विक्रमाशी केवळ ६४ व्या सामन्यातच बरोबरी!
फ्लॉवर @ ₹100; हंगामात उच्चांकी भाव मिळत असल्याने शेतकर्यांमध्ये समाधान