सुविधांसाठी नाशिक जिल्हा ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचा हट्टाग्रह कायम
नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा – सुविधांसाठी नाशिक जिल्हा ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने हट्टाग्रह कायम ठेवल्याने आडगाव येथील ट्रक टर्मिनसच्या जागेत साकारणाऱ्या इलेक्ट्रिक बस डेपो तसेच चार्जिंग स्टेशनचे काम गेल्या आठवडाभरापासूनच ठप्पच आहे. टर्मिनसच्या जागेत ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकांना जोपर्यंत सुविधा पुरविल्या जात नाहीत, तोपर्यंत काम सुरू होऊ न देण्याची भूमिका ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने घेतल्याने महापालिकेची कोंडी झाली आहे.
केंद्र सरकारने पीएम ई-बस योजनेअंतर्गत नाशिकसाठी १०० ई-बस मंजूर केल्या आहेत. पहिल्या टप्प्यात ५० ई-बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार असून, त्यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या ‘जेबीएम इकोलाइफ मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीसोबत करार करण्याची तयारी सिटीलिंकने केली आहे. शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर कराराची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या ई-बसेसकरिता महापालिकेच्या माध्यमातून आडगाव ट्रक टर्मिनसच्या जागेत ई-बस डेपो तसेच चार्जिंग स्टेशनची उभारणी केली जाणार आहे. यासंदर्भातील २८ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर महापालिकेने कामही सुरू केले होते. परंतु, टर्मिनसच्या जागेत ई-बस डेपो उभारण्यास ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने हरकत घेत काम बंद पाडले. जोपर्यंत ट्रक टर्मिनसला मूलभूत सुविधा पुरविल्या जात नाही तोपर्यंत ई-बस डेपो बांधू देणार नाही, अशी भूमिका असोसिएशनने घेतली आहे. यासंदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत अनेक वेळा बैठक झाल्यानंतरही सुवर्णमध्य निघू शकला नाही. तूर्तास महापालिकेने बस डेपोतील चार्जिंग स्टेशनसाठी वीज कनेक्शन घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
ट्रक टर्मिनसच्या जागेत सुविधा पुरविण्याच्या मागणीबाबत ट्रान्स्पोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढला जाईल. पीएम ई-बस योजनेअंतर्गत महापालिकेसाठी निधी मंजूर झाला असल्याने ई-बस डेपोचे काम निर्धारित मुदतीत पूर्ण होणे आवश्यक आहे. – संदेश शिंदे, कार्यकारी अभियंता, महापालिका
ट्रक टर्मिनसच्या जागेचे होणार ऑडिट
दरम्यान, आडगाव ट्रक टर्मिनसच्या जागेचे ऑडिट करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. आडगाव शिवारात ट्रक टर्मिनससाठी १०९ एकर जागा मंजूर करण्यात आली होती. त्यापैकी ४३ एकर जागा महापालिकेच्या ताब्यात आहे. उर्वरित ६७ एकर क्षेत्राचे भूसंपादन करावे लागणार आहे. ट्रक टर्मिनससाठी तूर्त १९ एकर जागा उपलब्ध आहे. २२ एकर जागा रिकामी आहे. त्यापैकी पाच एकर जागेवर ई-बस डेपो साकारले जाणार आहे. ट्रक टर्मिनसची जागा कमी होणार नसल्याचा दावा महापालिकेने केला आहे.
टर्मिनसच्या जागेत महापालिकेने कुठल्याही सुविधा पुरविलेल्या नाहीत. याठिकाणी श्वान निर्बीजीकरणाचे केंद्रही सुरू केले असून, मेलेले कुत्रे उघड्यावरच फेकले जात असल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. बस डेपोला आमचा विरोध नाही. ट्रक टर्मिनसमध्ये सुविधा मिळाव्यात, इतकीच मागणी आहे. – राजेंद्र फड, अध्यक्ष, ट्रान्स्पोर्ट असोसिएशन
हेही वाचा:
UGC-NET 2024 | ‘यूजीसी-नेट लीक प्रश्नपत्रिका डार्कनेट, टेलिग्रामवर सापडली’
नाशिक: ‘नाना’ आतुरतेने गाडीजवळ आले पण व्यर्थच… भेट नेमकी कशासाठी; ‘राज’ गुलदस्त्यात