पवार, ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे मारेकरी : चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : शरद पवार व उद्धव ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे मारेकरी आहेत. ते आता कोणत्या तोंडाने बोंबा मारत आहेत, असा थेट आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरूवारी (दि.२०) माध्यमांशी बोलताना केला.
महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करून सामाजिक वातावरण बिघडवण्याचे काम पवार व ठाकरे करत आहेत. केंद्र सरकारचा मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत कुठलाही संबंध नाही. उलट शरद पवार अनेक वर्षे सत्तेत होते. मुख्यमंत्री होते. मात्र त्यांची भूमिका मराठा आरक्षण विरोधात आहे. त्यांनीच मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला सवलती दिल्या नाहीत. आता ते याविषयी बोलतात, हे आश्वर्य आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारने मराठा आरक्षणाचा खटला योग्यरित्या कोर्टात लढला नाही. चांगले वकील लावले नाहीत. यामुळे ठाकरेंच्या काळात आरक्षण गेले. आता ते कोणत्या अधिकाराने बोंबा मारत आहेत. खरेतर पवार व ठाकरे यांनाच तुम्ही आरक्षण का दिले नाही आणि मिळालेले आरक्षण कोर्टात का गमावले? असा प्रश्न मराठा समाजातील नेत्यांनी व युवकांनी विचारावा, असेही ते यावेळी म्हणाले.
निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढा!
उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला लोक कंटाळले असून त्यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना त्यांनी काय कामे केली हे जनतेला सांगावे. सकाळचा राजकीय भोंगा न वाजविता शेतकरी, शेतमजुरांना न्याय मिळवून द्यावा व विधानसभा निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवावी, असा म्हणत बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
तसेच ठाकरे यांची भूमिका हिंदुत्वविरोधी आहे, त्यामुळेच त्यांना मुस्लिम मते मिळाली. हे महाराष्ट्राला माहिती झाल्यानेच मुंबई व कोकणातील सामान्य माणूसही उद्धव ठाकरेंसोबत नाही. उद्धव ठाकरे कॉंग्रेस व शरद पवारांची राष्ट्रवादी कॉंग्रेस वाढविण्याचे काम करीत आहेत. उद्धव ठाकरे यांनी आत्मपरिक्षण करावे, असा सबुरीचा सल्लाही यावेळी बावनकुळे यांनी दिला.
दरम्यान, महाविकास आघाडीकडे मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे व रोहित पवार तर कॉंग्रेसमध्ये नाना पटोले, विजय वडेट्टीवार आणि ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे, स्वतः उद्धव ठाकरे इच्छुक आहेत. महाविकास आघाडीने खोटे आश्वासन देऊन मते घेतली. पंतप्रधान मोदी संविधान बदलणार आहेत, आदिवासी समाजाचे हक्क काढणार, असा अपप्रचार केला. त्यांनी जनतेची माफी मागावी, असेही ते म्हणाले. तसेच केंद्र सरकारने १४ मुख्य पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ केली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या कापसाला व सोयाबीनला चांगला भाव मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
हेही वाचा :
NEET EXAM 2024 : ‘नीट’च्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती गठित करणार; शिक्षणमंत्र्यांची घोषणा
Arvind Kejriwal Bail : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर
Dhule News | धुळ्यात भाजपकडून खासदार शोभा बच्छाव यांच्यासह नाना पटोले यांच्या प्रतिमेस ‘जोडे मारो’
