मुंबई : बर्फीवाला उड्डाणपूल गोखले पुलाला जोडण्यात यश!

मुंबई; Bharat Live News Media वृत्तसेवा : मुंबई महापालिकेच्या पुलांतील बांधकामांमध्ये चर्चेत असलेला सी.डी. बर्फीवाला उड्डाणपूल अखेर गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपुलाला जोडण्यात आला आहे. यामुळे अंधेरी पूर्वेकडून पश्चिमेला जाणे आता सोयीचे आणि ट्राफिकमुक्त होणार आहे.
अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाचा भाग उचलून हायड्रॉलिक जॅक आणि ‘एमएस स्टुल पॅकिंग’चा वापर करून गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपुलाला जोडण्याचे अतिशय आव्हानात्मक काम महापालिकेद्वारे नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. याअंतर्गत बर्फीवाला उड्डापुलाचा भाग एका बाजुला १,३९७ मिलीमीटर आणि दुसऱ्या बाजुला ६५० मिमी वर उचलण्यात आला आहे. या जोडणीच्या कामासाठी जवळपास गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असणारे सूक्ष्मस्तरीय नियोजन आणि अथक प्रयत्नांना या महत्वाच्या टप्प्यात यश आले आहे. काँक्रिट क्यूरींगच्या कामानंतर १ जुलै रोजी या दोन्ही पुलांवरील वाहतूक सुरू करण्याची तयारी महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
गोखले पुलाला बर्फीवाला पुलाचा भाग जोडण्यासाठी स्थापत्य अभियांत्रिकीनुसार स्टिचिंग व काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. वेगाने काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण व्हावे यासाठी उच्च दर्जाचे काँक्रिट या कामासाठी वापरण्यात आले आहे. या कामानंतर पूलावर २४ तासांच्या कालावधीत ‘लोड टेस्ट’ करण्यात येईल. त्यासोबतच पुलाच्या जोडणी सांध्याचे कामही लवकरच पूर्ण होणे अपेक्षित आहे. यानंतर पुलावर वाहतूक सुरू होण्याच्या दृष्टीने आवश्यक ते कार्य यापूर्वी निर्धारित करण्यात आलेल्या टप्प्यांनुसार करण्यात येईल, असेही पूल विभागाद्वारे कळविण्यात आले आहे.
निसर्गाचीही लाभली साथ
दोन्ही पुलांच्या जोडणीसाठी आवश्यक असणाऱ्या स्टिचिंगच्या काँक्रिटीकरणाचे काम करताना व ते झाल्यानंतरही पुढील सलग सहा तास पाऊस न पडणे अपेक्षित व आवश्यक होते. मात्र, सुर्देवाने सदर सहा तासांच्या कालावधीदरम्यानच नव्हे, तर त्यानंतरदेखील सुमारे १२ तास पाऊस न आल्यामुळे काँक्रिटीकरणाचे व स्टिचिंगचे काम विनाअडथळा करणे शक्य झाले. त्यामुळे या कामाला निसर्गाचीही साथ लाभली.
असे जोडले दोन उड्डाणपूल
सी. डी. बर्फीवाला उड्डाणपूल एका बाजुला १,३९७ मिलीमीटर व दुसऱ्या बाजुला ६५० मिलीमीटर वरच्या दिशेने उचलण्यासाठी ‘हायड्रॉलिक जॅक’ आणि ‘एमएस स्टुल पॅकिंग’चा वापर करण्यात आला. त्याचबरोबर सी. डी. बर्फीवाला उड्डाणपूलाखाली पेडेस्टल (आधार देणारे खांब) वापरण्यात आले आहेत. एकूण दोन पेडस्टलचा आधार देत जोडणी करावयाचा भाग हा १,३९७ मिमी या उड्डाणपुलाचा गर्डर वर उचलण्यात आला आहे. त्यासोबतच सहा नवीन बेअरींगही त्या साच्यात बसविण्यात आल्या. पेडस्टलला देण्यात आलेले ‘बोल्ट’ हे सी. डी. बर्फीवाला उड्डाणपूलाच्या पिलरशी जुळणे हे अतिशय महत्वाचे आव्हान होते. अवघ्या २ मी.मी. जागेच्या अंतरामध्ये अतिशय अचूकपणे हे दोन्ही पेडेस्टल जुळवण्याचे आव्हान पूल विभागाचे अभियंता आणि सल्लागारांच्या तांत्रिक चमूने अतिशय नियोजनबद्धरीत्या व शास्त्रशुद्ध पद्धतीने जुळवून आणले. वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हिजेटीआय), आय. आय. टी. आणि स्ट्रक्ट्रॉनिक्स कन्सलटिंग इंजिनिअर्स या तांत्रिक सल्लागारांच्या देखरेखीखाली हे आव्हानात्मक काम पार पाडण्यात आले.
