‘इस्रो’ चा उपक्रम | उपग्रह, क्षेपणास्त्रनिर्मितीसाठी विद्यार्थ्यांना पाठबळl; विद्यार्थ्यांसाठी अनोख्या स्पर्धा

गणेश खळदकर
पुणे : अंतराळ क्षेत्रात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी आपला ठसा उमटवावा, यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ‘इस्रो’ विद्यार्थ्यांना पाठबळ देत आहे. त्यासाठीच उपग्रह आणि क्षेपणास्त्रनिर्मितीच्या स्पर्धा आयोजित करून त्यांना आपले कसब आजमावण्याची संधी ‘इस्रो’मार्फत देण्यात आली आहे. या दोन्ही स्पर्धा मार्च ते जून २०२५ मध्ये आयोजित केल्या जातील. विद्यार्थ्यांना या दोन्ही स्पर्धांत भाग घेण्यासाठी इन स्पेस डॉट गव्हमेंट डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट देणे आवश्यक असल्याचे अभियांत्रिकीच्या तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधनात सामावून घेण्यासाठी इन-स्पेस कॅनसॅट इंडिया आणि क्षेपणास्त्र इंडिया स्पर्धेचे आयोजन एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया आणि ‘इस्रो’ने केले आहे. या दोन्ही स्पर्धा अंतराळ क्षेत्रात संशोधनास इच्छुक विज्ञान आणि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी असल्याचे दिसून येत आहे.
इन स्पेस क्षेपणास्त्र इंडिया स्पर्धेत विद्यार्थ्यांना कॅनच्या आकाराचा एक किलोग्रॅम वजनाचा उपग्रह वाहून नेणाऱ्या क्षेपणास्त्राचा आराखडा, उत्पादन आणि प्रक्षेपण करण्याचे लक्ष्य देण्यात येते. जमिनीवरून हे क्षेपणास्त्र एक हजार मीटर उंचीपर्यंत प्रक्षेपित होऊन त्याने सोबत नेलेला उपग्रह विलग करून सुरक्षितपणे जमिनीवर उतरले पाहिजे. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना क्षेपणास्त्र विज्ञान शिकता येईल आणि संघकार्य आणि बांधणी, प्रकल्प व्यवस्थापन, परस्परसंवाद ही कौशल्ये आत्मसात करता येतील.
इन स्पेस कॅनसॅट इंडिया या स्पर्धेत विद्यार्थ्यांना एक किलोग्रॅम वजनाचा उपग्रह विकसित आणि उत्पादित करण्याचे लक्ष्य दिले जाते. हा उपग्रह एक हजार मीटर उंचीवरून प्रक्षेपित केल्यास तो पॅराशूटच्या साहाय्याने यशस्वीपणे जमिनीवर उतरला पाहिजे, ही अट असते. या दोन्ही स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना क्षेपणास्त्र आणि उपग्रह संपूर्णपणे विकसित करण्याची संधी मिळते आणि त्यातून विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधनाकडे आकर्षित करण्याचे आयोजकांचे ध्येय आहे.
पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन अभियांत्रिकी आणि टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांना मॅथेमॅटिक्स आणि अॅनालिटिकल नॉलेज मिळते, यातून त्यांचे कौशल्य मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होते.
– डॉ. सुनील भिरूड, कुलगुरू, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ
हेही वाचा
Ekadashi Ashadi Vari | शासनाकडून प्राप्त निधीमधून अखेर निर्मलवारीचे ठरले
अठ्ठावीस हजार ग्रा. पं. ना ऑक्टोबरपासून इंटरनेट सुविधा
Nashik Teachers’ Constituency : शिक्षकांनो, निवडणुकीत मतदान अवश्य करा – जिल्हाधिकारी जलज शर्मा
