37 वर्षांनीही एचसीएमटीआर कागदावरच; आराखड्यात मात्र तीन वेळा केला बदल
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महत्त्वाकांक्षी ठरू शकणारा उच्चक्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्ग तब्बल 37 वर्षांनंतरही कागदावरच आहे, असे असताना आता या आराखड्यात पुन्हा बदलांचा घाट घातला असून, तिसर्यांदा या त्यात बदल प्रस्तावित करण्यात आले आहेत.
१९७५ – सुरळीत वाहतुकीसाठी आराखडा
१९८७ – मनपा विकास आराखड्यात 36 किलोमीटरचा मार्ग आरक्षित
२०१७ – आराखड्यात बदल
२०१९ – पुन्हा एकदा बदल
नुसते आराखडे आखून करायचयं काय?
शहराच्या वाहतूक आणि रस्त्यांबाबत 1975 साली एक आराखडा तयार करण्यात आला होता. त्यावेळच्या परिस्थितीनुसार शहराच्या बाहेरून वर्तुळाकार पध्दतीने एचसीएमटीआर मार्गाची आखणी करण्यात आली होती. महापालिकेच्या 1987 च्या विकास आराखड्यात 36 किलोमीटरचा मार्ग आरक्षित करण्यात आला. या मार्गाचा आराखडा अद्यापही कागदावरच आहे. असे असताना 1987 नंतर या मार्गाच्या आराखड्यात 2017 त्यानंतर 2019 साली बदल केले होते, त्यानंतर पुन्हा एकदा या मार्गाच्या आराखड्यात तब्बल 12 ठिकाणी बदल करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. यामधील काही बदल प्रत्यक्ष जागेवरील स्थितीनुसार करण्यात येत असले, तरी काही बदल हे सर्व पक्षीय नगरसेवकांनी मुख्य सभेत दिलेल्या उपसूचनांच्या आधारे प्रस्तावित करण्यात आले आहे. यासंबंधीची अधिसूचना नगरविकास खात्याने काढली असून, त्यावर नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागविल्या आहेत. त्यामुळे हा मार्ग होणार की नाही याबाबत साशंकता असली, तरी आराखड्यात बदल करण्याचे उद्योग मात्र जोमाने सुरू आहेत. त्यामुळे अद्यापही हा मार्ग कागदावरच असल्याचे दिसून येत आहे. पुढे या मार्गाला गती कशी मिळणार हे मात्र बघण्यासारखे राहणार आहे.
या मार्गाचा मूळ प्रस्ताव बाजूला ठेवून महापालिकेने केलेल्या फेरबदलास राज्य सरकारने काही अटींवर मान्यता दिली आहे. काही मूठभर बांधकाम व्यावसायिकांसाठी या मार्गात 26 ठिकाणी बदल सुचविण्यात आला आहे. त्यामुळे ’एचसीएमटीआर’च्या या फेरबदलास काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध असून, वेळप्रसंगी न्यायालयात दाद मागण्याचा आमचा विचार आहे.
– आबा बागुल, माजी विरोधी पक्षनेते
एचसीएमटीआर मार्गाचा 1987 मध्ये आराखडा केला तेव्हा तो फक्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठीच होता. मात्र, आता या मार्गाच्या आराखड्यात खासगी वाहनांसाठी लेन प्रस्तावित करण्यात आली आहे. जर खासगी वाहनांना प्रवेश मिळाला, तर सार्वजनिक वाहतुकीचा वापर कसा होणार, असा प्रश्न आहे. त्यामुळे महापालिकेने अशी विरोधी भूमिका न घेता खासगी वाहनांच्या लेनचा हट्ट सोडला पाहिजे. तरच हा प्रकल्प यशस्वी होईल.
– प्रांजली देशपांडे, वाहतूक तज्ज्ञ
हेही वाचा
महाड तालुक्यातील कत्तलखाने उद्ध्वस्त करा : नितेश राणे
आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | गुरूवार, २० जून २०२४
पर्यटनात नव्या संधींची चाहूल