तडका : पाण्यासाठी दाहीदिशा

सर्वांना कल्पना आहे की, मराठवाडा आणि विदर्भ तीव— अशा पाणीटंचाईला सामोरे जात आहेत. मे महिन्याच्या अखेरीस जवळपास सर्व धरणे कोरडीठाक पडली आहेत आणि त्यामुळे काही भागात पिण्याच्या पाण्याचीही टंचाई झाली आहे, हे मान्य आहे; पण मग याला शासन तरी काय करणार? धरणातच नाही तर शासनाने पाणी आणायचे तरी कुठून आणि तुमच्यापर्यंत पोहोचवायचे तरी कसे? मध्यंतरी …

तडका : पाण्यासाठी दाहीदिशा

सर्वांना कल्पना आहे की, मराठवाडा आणि विदर्भ तीव— अशा पाणीटंचाईला सामोरे जात आहेत. मे महिन्याच्या अखेरीस जवळपास सर्व धरणे कोरडीठाक पडली आहेत आणि त्यामुळे काही भागात पिण्याच्या पाण्याचीही टंचाई झाली आहे, हे मान्य आहे; पण मग याला शासन तरी काय करणार? धरणातच नाही तर शासनाने पाणी आणायचे तरी कुठून आणि तुमच्यापर्यंत पोहोचवायचे तरी कसे? मध्यंतरी लातूरला पाणीटंचाई झाली तेव्हा तिथे रेल्वेने पाणीपुरवठा करून लोकांना पिण्यासाठी पाणी देण्यात आले. खेड्यापाड्यात, तांड्यावर आणि वस्त्यांवर पाणी पोहोचणार कसे आणि आणणार तरी कुठून? हा मोठाच प्रश्न असतो. पाणी नाही, पाणी नाही म्हणून ओरड करणार्‍या जनतेने हे लक्षात घेतले पाहिजे की, चक्क राजधानी दिल्लीतही पाणी नाही.
भारतासारख्या विकसनशील देशाच्या राजधानीची ही स्थिती असेल, तर मग बाकी लोकांनी ओरडण्यात काही अर्थ नाही. दिल्ली राजधानी आहे म्हटले, तर तुम्हाला असे वाटेल की, तिथे सर्व काही अलबेल असेल आणि गेल्या 70 ते 80 वर्षांत किमान राजधानीमध्ये सर्व सुविधा विनासायास बारा महिने चोवीस तास मिळत असतील; पण सध्या तेथे अशी स्थिती नाही.
थोडाबहुत पाण्याचा साठा करून एखादा दिवस कसाबसा काढला जातो. याचे कारण म्हणजे फ्लॅट सिस्टीममध्ये जागा असतेच ती किती? टीचभर जागेत माणसांची राहण्याची मारामार तिथे पाण्याने भरलेले ड्रम साठवून ठेवणार तरी कसे आणि साठवून ठेवणार तरी किती, हा मोठाच प्रश्न असतो. अशा साठा केलेल्या पाण्याचा वापर मोजून मापून केल्यास एक किंवा फार तर दोन दिवस जातात; परंतु यावेळी पिण्यासाठी चक्क बिसलेरी बॉटल पाण्याच्या पाच किंवा वीस लिटरच्या बाटल्या भरून आणाव्या लागतात. अशावेळी आंघोळीच्या गोळ्या घेऊन पाणी वाचवता येते. असे फार तर दोन किंवा तीन दिवस जातील; परंतु चौथ्या दिवशी जनता अस्वस्थ होते आणि नेमका त्याचवेळी त्या परिसरात एक टँकर येतो. एखादा पाणीपुरवठ्याचा टँकर आला, तर जशी गर्दी खेडोपाडी होते तशीच सध्या दिल्लीमध्ये होत आहे. एका टँकरला गुळाला मुंगळे चिटकावे तसे शंभर-दीडशे लोक बकेट, घागरी किंवा जे काय सापडेल ते घेऊन चिटकलेले दिसतात आणि मग आपल्या डोळ्यांपुढे राजधानीचे हे चकित करणारे द़ृश्य येते.
चक्क देशाच्या राजधानीमध्ये अशी पाण्यासाठीची आणीबाणीची स्थिती असेल, तर मग तुम्ही-आम्ही आणि गावखेड्यात राहणारे नागरिक यांना तक्रार करण्याचे काही कारण नाही. खेड्यापाड्यात तरी किमान आजुबाजूला कुठेतरी विहिरी किंवा बोर असतात. तिथून तुम्ही पाणी आणू शकता; परंतु मुंबई आणि दिल्लीसारख्या महानगरांमधील लोकांनी काय करायला पाहिजे? यामुळे तुमच्या शहरात पाणीबाणी असेल तरी शांत राहा. आपल्यापेक्षा मोठ्या संकटात असलेल्या लोकांकडे पाहिले, तर आपल्याला धीर येत असतो. आपण आपले दिल्लीकडे पाहावे. दिल्लीमध्ये अशी परिस्थिती असेल, तर मग आपल्याकडे त्यापेक्षा चांगली परिस्थिती आहे असे समजून आपले स्वतःचे समाधान करून घ्यावे यातच आपले हित सामावलेले आहे. पाऊस पडेलच. धरणे भरून जुलैच्या मध्यापर्यंत सर्वत्र पाणीच पाणी होऊन जाईल अशी आशा ठेवूयात. शेवटी आयुष्य म्हणजे काय, आशेवर जगणारा एक बुडबुडा! नव्हे तर दुसरे काय असते?