नारायण राणे यांची खासदारकी रद्द करा: विनायक राऊत
मुंबई, Bharat Live News Media वृत्तसेवा : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांनी भ्रष्ट मार्गांचा वापर करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलेला आहे. त्यामुळे नारायण राणे यांची निवड रद्द करावी. तसेच त्यांच्यावर 5 वर्ष निवडणुक लढवण्यापासून आणि मतदान करण्यापासून बंदी घालण्यात यावी. याबाबत ठाकरे शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी अॅड. असीम सरोदे, अॅड. किशोर वरक, अॅड. श्रीया आवले यांच्या मार्फत निवडणूक आयोगाला कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे.
निवडणूक प्रचार कालावधी दि.5 मे रोजी संपुष्टात आला. त्यानंतरही भाजप कार्यकर्त्यांनी दि. 6 मे रोजीसुद्धा नारायण राणे यांचा प्रचार करीत होते. राणेच्या समर्थकांनी प्रचार संपलेला असताना ईव्हीएम मशीन दाखवून राणे साहेबांनाच मत द्या, असे सांगून मतदारांना पैसे देत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या सर्व गोष्टींची माहिती नोटीसमध्ये नमूद करण्यात आलेले आहे.
नितेश राणेंकडून मतदारांना इशारा
नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी जाहीर सभा घेऊन मतदारांना इशारा दिला की, “जर राणे साहेबांना मतदान केले नाही, त्यांना लीड मिळाली नाही, तर आमच्याकडे निधी मागायला यायचे आहे. तुम्हाला निधीसुद्धा मिळणार नाही, असा इशारा 13 एप्रिल रोजी झालेल्या सभेत राणे यांनी दिला होता. याचाही उल्लेख या नोटीसमध्ये करण्यात आलेला आहे.
निवडणूक आचारसंहितेचा नारायण राणे, नितेश राणे आणि भाजप कार्यकर्त्यांनी भंग केलेला आहे. त्यामुळे ही लोकशाहीची फसवणूक असून निवडणूक आयोगाने याची चौकशी करून सात दिवसांमध्ये उत्तर द्यावे, अशी मागणी विनायक राऊत यांनी केलेली आहे. तसेच या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
पारदर्शक वातावरणात मतदान, मतमोजणी झाली नाही : अॅड. असीम सरोदे
अनेक ठिकाणी सुरक्षित आणि पारदर्शक वातावरणात मतदान तसेच मतमोजणी झाली नाही. निवडक पद्धतीने भ्रष्टाचार करू देणे, भाजपच्या लोकांनी केलेला भ्रष्टाचार आणि बेकायदेशीरतेकडे दुर्लक्ष करणे असे प्रकार काही निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या मदतीने करण्यात आले आहेत. हे वास्तव लोकशाही यंत्रणेचा गैरवापर दाखविणारे आहेत. त्याबाबत नागरिक म्हणून भारतावर प्रेम करणार्या प्रत्येकाने चिंता व्यक्त करावी, अशी परिस्थिती असल्याचे अॅड. असीम सरोदे म्हणाले.
हेही वाचा :
राऊत काही काम करणार नाही; मी निवडून आलो तर मंत्री होणार : नारायण राणे
Lok sabha Election 2024 Results : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणेंचा मोठा विजय
Closing Bell | सेन्सेक्स- निफ्टी सपाट, पण Bank Nifty नव्या शिखरावर