जळगावात पाणीपुरी खाल्ल्याने ८० पेक्षा अधिक जणांना विषबाधा

जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा- चोपडा तालुक्यातील कमळगाव येथे (दि. १७ ) संध्याकाळी आठवडे बाजारात पाणीपुरी खाल्ल्याने सुमारे ८० पेक्षा अधिक जणांना विषबाधा झाली. यात ३० पेक्षा अधिक जणांवर अडावद येथील ग्रामीण रुग्णालयात तर इतरांनी खाजगी डॉक्टरांकडे उपचार घेतले.
कमळगाव आणि आजूबाजूच्या खेड्यांतील तसेच चांदसणी, मितावली, पिंप्री येथील ग्रामस्थ १७ जून रोजी संध्याकाळी बाजारासाठी आले होते. तेथील पाणीपुरी विक्रेत्यांकडून अनेकांनी पाणीपुरी खाल्ली. पाणीपुरी खाल्लेल्यांना मंगळवारी सकाळी उलट्या, जुलाब, पोटात दुखणे असे त्रास जाणवू लागले. यापैकी अनेक रुग्णांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले. संध्याकाळी ६ वाजेनंतर अचानक रुग्णांमध्ये वाढ झाली. अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रासह अडावद व चोपडा येथील खासगी रुग्णालयांतही अन्नामुळे विषबाधा झालेल्या रुग्णांची संख्या वाढतच गेली. यापैकी डिंपल कोळी (१६), आयर्न सपकाळे (७), पवन सोनवणे (१३), निकिता कोळी (१३), चेतना सपकाळे (१९) यांच्यासह ३० जणांना उपजिल्हा रुग्णालय, चोपडा येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. पाणीपुरीमुळे त्रास झाल्याबाबत सोमनाथ जगन कोळी (रा. पिंप्री) यांनी पोलिस स्टेशनला लेखी जबाब दिला आहे.
अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रात पिंप्री, कमळगाव येथील विषबाधा झालेले सर्वच वयोगटातील रुग्ण वाढतच गेले. या ठिकाणाहून ७० पैकी ३० रुग्ण चोपडा येथे उपजिल्हा रुग्णालयात व इतर रुग्ण खासगी व जळगाव जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. रात्री सुमारे १० रुग्णांवर अडावद येथे उपचार सुरू होते.
घटना समजल्यानंतर चोपडा तालुका गटविकास अधिकारी रमेश वाघ तसेच आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर हे आरोग्य पथकांसह दाखल झाले होते.
हेही वाचा –
कारवारमधून गोव्याला बेडकांची तस्करी; जंपिंग चिकन थाळीसाठी मागणी, दोघांना अटक
नालंदाच्या पुनरुज्जीवनामुळे भारताच्या ‘सुवर्णयुगाची’ सुरुवात: पंतप्रधान
