रशिया उत्तर कोरियाला पाठिंबा देईल : राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी आज (दि.१९) प्योंगयांगमधील किम इल सुंग स्क्वेअर येथे भव्य स्वागत समारंभानंतर शिखर बैठक घेतली, रशियन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार व्लादिमीर पुतिन यांनी दोन्ही राष्ट्रांमधील संबंध दृढ करण्याचे वचन दिले आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी तब्बल २४ वर्षांनंतर आज (दि.१९) सकाळी उत्तर कोरियाला भेट दिली. कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी स्वतः विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत केले. रशियाचे १० मंत्री आणि अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ पुतीन यांच्यासोबत उपस्थित आहे. यामध्ये परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव आणि संरक्षण मंत्री आंद्रे बेलोसोव्ह यांचा समावेश आहे.
पुतिन यांनी किम जोंग यांचे मानले आभार
आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या वृत्तानुसार पुतिन यांच्या स्वागतासाठी भव्य परेड व्यतिरिक्त, प्योंगयांगमधील तब्बल १०५ मजली रुग्योंग हॉटेल एलईडी लाइट्सने सजवण्यात आले होते. त्यावर ‘वेलकम पुतिन’ आणि ‘फ्रेंडशिप’ लिहिलेले होते. रशियन न्यूज एजन्सी इंटरफॅक्सने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय बैठकही झाली. यादरम्यान पुतिन यांनी युक्रेन युद्धात रशियाला पाठिंबा दिल्याबद्दल किम जोंग यांचे आभार मानले.
रशिया उत्तर कोरियाला पाठिंबा देईल : पुतिन
भेटीदरम्यान व्लादिमीर पुतिन यांनी आश्वासन दिले की, रशिया अमेरिकेचा दबाव, धमक्यांच्या विरोधात उत्तर कोरियाला पाठिंबा देईल. त्याचबरोबर किम जोंग यांना रशिया भेटीचे निमंत्रणही दिले. किम जोंग यापूर्वी सप्टेंबर २०१३ मध्ये रशियाच्या व्होस्टोचनी कॉस्मोड्रोममध्ये आले असता तिथे पुतिन यांनी त्यांचे स्वागत केले होते. भेटीदरम्यान किम जोंग यांनी युक्रेनविरुद्धच्या रशियाच्या युद्धाचे समर्थन करत असल्याचे सांगितले होते की, दोन्ही देश विकासाच्या नव्या टप्प्याकडे वाटचाल करत आहेत. अशा स्थितीत उत्तर कोरिया रशियासोबतची मैत्री आणखी वाढवण्यासाठी कटिबद्ध आहे.
रशिया आणि उत्तर कोरिया यांच्यातील जवळीक वाढली ?
उत्तर कोरियाची २०११ मध्ये सत्ता हाती घेतलेल्या किम जोंग उन यांनी आपल्या वडिलांप्रमाणे रशिया आणि चीनसोबत चांगले संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला. रशियाने २०१२ मध्ये उत्तर कोरियाची सर्व कर्जे माफ केली होती. वृत्तानुसार, युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून रशिया अमेरिकाविरोधी देशांशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहे.
हेही वाचा
संशोधन : भारतीय शास्त्रज्ञाचा आंतरराष्ट्रीय सन्मान
जूनमध्ये आंतरराष्ट्रीय ‘शौर्यथॉन’
एका महिन्यात एमबीबीएसची पदवी; १६ लाखांच्या मोबदल्यात प्रमाणपत्र
