जलपर्णीच्या गळफासाची गोष्ट!

उदय कुलकर्णी
दिवस ‘बरसो रे मेघा मेघा,’ असं म्हणण्याचे आहेत. केरळात पाऊस लवकर पोहोचला तरी महाराष्ट्रात त्यानं थोडी उसंत घेतली. आता पावसाची पुन्हा रिपरिप सुरू झाल्यानंतर धरणांतील तळाला गेलेला पाणीसाठा वाढू लागेल. यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट असेल, ती म्हणजे गेले दोन-तीन महिने नदीपात्रावर जलपर्णीचा जो गालिचा पसरला होता, तो नदीच्या वाहत्या पाण्याबरोबर पुढे निघून जाईल.
काही वर्षांपूर्वी रंकाळा तलाव जलपर्णीनं पूर्ण आच्छादला गेला होता. पाण्याची दुर्गंधी, डासांची उत्पत्ती, जैवविविधतेला धोका, असे अनेक प्रश्न त्यातून निर्माण झाले. जलपर्णी नियंत्रणासाठी अनेक उपाययोजना झाल्या; पण तलाव आणि नदीतील जलपर्णीची वाढ पूर्णपणे थांबवता आली नाही. जलपर्णी वाढीबाबत ओरड सुरू झाली की, धरणातून पाणी सोडून नद्यांची पात्रं धुवून काढायची, असा उद्योग गेली अनेक वर्षं सुरू आहे. कोट्यवधी रुपये खर्चून धरणं बांधायची आणि त्यातील पाणी असं नदीपात्र धुवायला वापरायचं, हे काही योग्य नाही.
तलावात जलपर्णी वाढली की, ती विविध मार्गांनी काढण्याचा प्रयत्न करणं, असंही केलं जातं. खरं तर 1990 च्या दशकात सांगलीतील ‘शिवसदन सहकारी औद्योगिक वसाहती’त ज्येष्ठ अभियंते व्ही. आर. जोगळेकर यांनी जलपर्णीचा वापर करून खत, जनावरांसाठी खाद्य, जैविक इंधननिर्मिती करण्याचा प्रयोग केला होता. हाच प्रयोग कोल्हापुरातील रंकाळ्यातील जलपर्णीबाबत करता येईल का, असा विचार मनात आला तेव्हा मी स्वत: कोल्हापूर महापालिकेच्या तत्कालीन जनसंपर्क अधिकार्यांना सोबत घेऊन ‘शिवसदन’मधील प्रकल्प दाखवला होता. प्रत्यक्षात महापालिकेनं पुढे त्याचा काही वापर करून घेतला नाही, हा भाग वेगळा!
पूर्वी जलपर्णी भारतात आणि कोल्हापुरातही नव्हती; मग ती आली कुठून? या वनस्पतीचं मूळ शोधायचा प्रयत्न केला तेव्हा लक्षात आलं की, जलपर्णीचा उगम दक्षिण अमेरिकेतील अॅमेझॉन खोर्यात झाला आहे. सुरुवातीला शोभेची वनस्पती म्हणून तिच्याकडे पाहिलं जायचं. 1895 मध्ये दक्षिण अमेरिकेतून जलपर्णी ऑस्ट्रेलियात पोहोचली आणि तिथून 1902 मध्ये तिनं भारतात प्रवेश केला. भारतानंतर मलेशिया, झिम्बाब्वे, केंगोसह अनेक देशांत ती पसरली. सुमारे 14 ते 29 अंश सेल्सिअस तापमानात ही वनस्पती फोफावते. जलपर्णीच्या सुमारे 7 प्रमुख जाती आहेत. ज्या पाण्यात शहराचं सांडपाणी मिसळतं, त्या पाण्यात ती हमखास वाढते.
तळ्यात दरवर्षी हेक्टरी 255 टन जलपर्णीची वाढ होऊ शकते. अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये सेंट जॉन नदीत वाढलेली जलपर्णी मोहक दिसते म्हणून नदीकाठच्या एका तळ्यातील कारंजात ती सोडली. पाच वर्षांत जलपर्णीनं अख्खं तळं व्यापलं. नदीपात्रावरही जलपर्णीचं आक्रमण इतकं झालं की, बोटीनं सर्वप्रकारची वाहतूक बंद झाली. लोकांच्या उत्पन्नावर, व्यापारावर परिणाम झाला. त्यामुळं जलपर्णी निर्मूलनासाठी वेगळा कायदा करावा लागला. अनेक प्रकारची आम्लं, अर्सेनिक, पारा व तत्सम विषद्रव्यांची संयुगं वापरून जलपर्णी नष्ट करण्याचा प्रयत्न झाला; पण त्यामुळं जलचर आणि जनावरं यांचं जीवन धोक्यात आलं.
जलपर्णी आटोक्यात आणण्यासाठी अमेरिकेनं आतापर्यंत सर्वाधिक संशोधन केलं आहे; पण तरीही 70-75 वर्षांत अमेरिकेलाही जलपर्णी निर्मूलन करता आलेलं नाही. शोधता आले ते त्याच्यावरील नियंत्रणाचे उपाय. भारतात जलपर्णीच्या बीपासून जलपर्णीची निर्मिती होते, त्यावेळी तिची मुळं परत परत फुटून जलपर्णी निर्माण होते. पैदास काळात 25 जलपर्णींची रोपं पाण्यामध्ये अनुकूल परिस्थिती मिळाली की 2 लाख रोपं तयार करू शकतात. सध्या भारतात जलपर्णी नियंत्रणाचे उपाय दोन प्रकारचेच असू शकतात. एक म्हणजे तलाव आणि नद्यांत सांडपाणी मिसळणं पूर्णपणे रोखायला हवं आणि दुसरं म्हणजे जिथं जलपर्णी नियंत्रण तत्काळ शक्य नाही, तिथं जलपर्णीपासून काही समाजोपयोगी उत्पादनं घेता येऊ शकतात का, या दिशेनं प्रयोग व तंत्रज्ञान विकसित करण्यास प्रोत्साहन देणं!
