सिडकोमध्ये दोन दिवस तब्बल पाच तास बत्ती गुल; नागरिकांमध्ये संतापाची लाट
सिडको (नाशिक) : राजेंद्र शेळके
येथील राजरत्ननगर, साईबाबानगर तसेच परिसरात रविवारी (दि. 16) आणि सोमवारी (दि. 17) दिवसभरात चार ते पाच वेळा वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
सलग दोन दिवस तब्बल पाच तास वीजपुरवठा खंडित झाल्याने कामे ठप्प झाली.
आइस्क्रीम, शीतपेय विकणाऱ्या व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान.
महावितरणने तक्रार नोंदविण्यासाठी ग्राहकांना दिलेला मोबाइल बंद
राजरत्ननगर, साईबाबानगर तसेच परिसरात रविवारी (दि. 16) आणि सोमवारी (दि. 17) सकाळी दिवसभर विजेचा लपंडाव सुरू होता. सलग दोन दिवसांत चार-पाच वेळा वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची कामे ठप्प झाली होती. यात व्यापाऱ्यांचेही अधिक नुकसान झाले. बाहेर कडक ऊन असताना घरात घामांच्या धारांनी नागरिक हैराण झाले होते. वीजपुरवठा खंडित असल्याने घरातील फॅन, कूलर व एसी बंद असल्याने नागरिकांचे हाल झाले. फ्रीजमध्ये ठेवलेला भाजीपालाही खराब झाला आहे. त्यामुळे गृहिणींनी संताप व्यक्त केला, तर दुसरीकडे थंड पेय तसेच आइस्क्रीम, शीतपेय विकणाऱ्या व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.
राजरत्ननगर भागात कायमच वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे व्यापारी व नागरिक यांचे हाल होत आहेत. महावितरणने वीजपुरवठा सुरळीत करावा. – तुळशीराम भागवत, राजरत्ननगर
महावितरण वीजबिलाबाबत प्रचंड सतर्क असते. लाइट बिल भरायची तारीख संपताच लगेच वायरमनचा फोन येतो किंवा वायरमन लाइट कट करण्यासाठी येतो. परंतु ही तत्परता वीज बंद करण्याआधी आगाऊ सूचना देण्यासंदर्भात वापरली तर सोयीचे होईल, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. पावसामुळे अथवा एखाद्या तांत्रिक अडचणीमुळे वीज बंद झाली, तर नागरिक त्रास सहन करतात. परंतु विनाकारण वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यात मे महिन्यात सिडकोत वीजपुरवठा वारंवार बंद करण्याचे प्रमाण खूपच राहिल्याने यंदा नागरिकांनी उन्हाळा कसाबसा सहन केला आहे.
आमच्या भागात कायम वीजपुरवठा खंडित होत असल्याने व्यापारी व दुकानदार यांचे मोठे नुकसान होत आहे. -संजय सोनवणे, दुकानदार
तक्रारीचा क्रमांक बंद
सिडकोत अनेक भागांत वीज खांबावरील इन्सुलेटर तीव्र उन्हामुळे खराब होत आहेत. ते दुरुस्त करण्यात आले. त्यानंतर अनेक भागांत केबल जळून खराब झाली. त्यानंतर महावितरणचे खराब झालेली केबल दुरुस्तीचे काम सुरू होते. महावितरणने तक्रार नोंदविण्यासाठी ग्राहकांना दिलेला मोबाइल बंद येत होता. आता तक्रार कोणाकडे करायची? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. राजरत्ननगर, साईबाबानगर पूर्णपणे काळोखात आहे. फोन लागत नसल्याने नागरिकामधे संतापाची लाट उसळली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून राजरत्ननगर, लोकमान्यनगर, पवननगर, साईबाबानगर, उत्तमनगर या भागांमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. पूर्वी दर शनिवारी वीजतारा दुरुस्तीचे, झाडाच्या फांद्या तोडण्याचे काम केले जायचे अथवा अन्य दुरुस्तीचे काम असल्याने काही तासांसाठी वीजपुरवठा खंडित केला जायचा. त्यामुळे दर शनिवारी दुरुस्तीच्या कामामुळे लाइट (दिवसा) बंद होणार याची नागरिकांना माहिती होती. आता वेळी-अवेळी कधीही वीजपुरवठा बंद केला जातो. यासाठी महावितरणकडून कोणतीही पूर्वसूचना दिली जात नाही. –गोरक्षनाथ कासार, व्यापारी
हेही वाचा:
नाशिक : इंदिरानगरमध्ये महापालिकेचा अजबगजब कारभार; नको त्या रस्त्यांवर गतिरोधक-सिग्नल उभारणी
Stock Market Opening Bell : शेअर बाजारात ‘तेजी’ची धूम कायम, सेन्सेक्स-निफ्टीने केला नवा विक्रम