भाजपकडून विधानसभेची तयारी! अनेक राज्यांत नेमले प्रभारी

भाजपकडून विधानसभेची तयारी! अनेक राज्यांत नेमले प्रभारी

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : महाराष्ट्रात सहा महिन्यानंतर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपने संघटनात्मक फेरबदल करायला सुरूवात केली असून महाराष्ट्रासह हरियाणा, झारखंड आणि जम्मू कश्मीरसाठी निवडणूक प्रभारी आणि सहप्रभारींची नियुक्ती जाहीर केली आहे. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून तर अश्विनी वैष्णव यांच्याकडे सहप्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
हरियाणा, झारखंड, जम्मू काश्मीरचेही प्रभारी जाहीर
महाराष्ट्रासोबतच विधानसभा निवडणूक होऊ घातलेल्या हरियाणासाठी निवडणूक प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची तर सहप्रभारी म्हणून त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री विप्लव कुमार देव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. झारखंड राज्यासाठी प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांची तर सहप्रभारी म्हणून आसामचे मुख्यमंत्री डॉ. हेमंता विश्वा शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरसाठी केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आहे. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी या सर्व नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
अपयश विसरून कामाला लागल्याचा भाजपचा संदेश
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नसल्याने आागामी विधानसभा निवडणुकीत संघटनात्मक पातळीवर कुठलीही कसर राहू नये म्हणून भाजपने सर्वात आधी प्रभारी आणि सहप्रभारींची नियुक्ती जाहीर केली आहे. या नियुक्त्यांमधून लोकसभा निवडणुकीतील अपयश विसरून आम्ही जोमाने कामाला लागलो असल्याचा संदेश भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिला आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर काँग्रेसची टीका
कांचनजंगा येथे सोमवारी सकाळी झालेल्या अपघातानंतर काही तासांतच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भाजपने महाराष्ट्राचे सहप्रभारी म्हणून नियुक्ती केल्याबद्दल काँग्रेसने टीका केली आहे. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांनी एक्सवर पोस्ट करून अश्विनी वैष्णव यांच्यावर निशाना साधला आहे. ‘रेल्वे मंत्र्यांवर मोठी कारवाई, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी दिली सहप्रभारी म्हणून जबाबदारी’ अशी उपरोधिक टीका श्रीनिवास बी. व्ही यांनी केली आहे.

Go to Source