तडका : गदारोळाचे लोण..!
संसदेमधील खासदारांची हाणामारी पाहून डोळे तृप्त झाले, मनाचे समाधान झाले. खासदार हे महत्त्वाचे असतातच आणि संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व ते संसदेमध्ये करत असतात. असे सर्व खासदार जेंटलमन असणे अपेक्षित असते; परंतु दरवेळेला तसे असतेच असे नाही. संसदेमधील चर्चेमध्ये वाद होणे अपेक्षित आहे; कारण प्रत्येकाचे काही एक म्हणणे असते. वादावादीचे रूपांतर हाणामारीमध्ये होऊन संसदेमध्ये गदारोळ होतो.
घडले असे की, इटलीच्या संसदेत एका दुरुस्ती विधेयकावरून खासदारांमध्ये वादावादी झाली आणि चक्क एकमेकांना धरपकड आणि मारहाण झाल्याची घटनाही घडली. देशातील काही भागांना स्वायत्तता देण्यासंबंधीचे हे विधेयक होते. काही खासदारांनी या विधेयकाला विरोध केला आणि मग पुढे जे घडले ते संपूर्ण जगाने व्हिडीओच्या माध्यमातून बघितले आहे. एक खासदार आणि एक मंत्री यांच्यामध्ये सुरुवातीला वाद झाला आणि त्यात इतर खासदारांनी त्यांच्याभोवती गर्दी केली आणि बघता बघता वादावादीचे रूपांतर मारहाणीत झाले.
लोकप्रतिनिधी निवडून देताना जनतेच्या फार मोठ्या अपेक्षा असतात. आपल्या जिल्ह्याचे, आपल्या मतदारसंघाचे किंवा एकंदरीतच आपल्या दैनंदिन जगण्याचे प्रश्न आपल्या प्रतिनिधींनी राष्ट्रीय पातळीवर मांडावेत, ही जनतेची अपेक्षा अजिबात चुकीची नाही. बरेचसे खासदार हे पाच वर्षांमध्ये एकदाही संसदेत तोंड उघडत नाहीत. तुम्हास वाटेल की, खासदारांचा अभ्यास कमी पडतो; पण तसे नाहीये. अभ्यास भरपूर आहे; परंतु तो तिथे मांडण्याचा आत्मविश्वास नाही, अशी परिस्थिती असते. हीच परिस्थिती विधानसभेमध्ये असते.
बर्याचशा आमदारांचा शाब्दिक कृतीपेक्षा शारीरिक कृतीवर भर असतो. एखाद्या मंत्र्याने दिलेले उत्तर आवडले नाही, तर थेट त्याच्या अंगावर धावून जाण्याची प्रथा आपल्याकडे. अशाच मारामार्या होत राहिल्या तर विधानसभा आणि लोकसभेमध्ये प्रत्येक उमेदवाराला, प्रत्येक आमदार, खासदाराला काचेचे केबिन द्यावे लागेल व त्याला बाहेरून कुलूप टाकावे लागेल. याचा अर्थ जे काय बोलायचे ते आत केबिनमधून बोल, बाहेर येऊन हातापायी नको किंवा हातघाईवर येऊन मारामारी नको. यासाठी काही ना काही तरी उपाययोजना नजीकच्या भविष्यात कराव्या लागतील, अशी शक्यता दिसत आहे. अधिवेशन काळामध्ये बहुत्येक आमदार, खासदार शक्तिवर्धक असे ड्रायफ्रूटस् खातात की काय, माहीत नाही; परंतु यामुळे त्यांना स्फुरण चढते आणि वेळ प्रसंग आला तर आणि कुणी अंगावर आले तर शिंगावर घेण्याची त्यांची तयारी असते.
आपल्याच विधान मंडळांमध्ये असे गोंधळ होतात म्हणून आपल्याला आजपर्यंत लाज वाटत होती; परंतु इटलीने आपला हा प्रश्न सोडवला आहे. तथाकथित पाश्चिमात्य देशातील खासदारही मुद्द्यावरून गुद्द्यावर येत आहेत, हे गुद्दे संस्कृती वाढत चालल्याचे लक्षण आहे. आपल्याकडील चालीरीतींचा प्रभाव इतर देशांवर होऊन त्यांनी त्याचा अंगीकार करावा यासारखे सुख कोणते नाही. इटलीत घडलेल्या घटनेमुळे भारतीय लोक सुखावले आहेत हे निश्चित. गदारोळ घालणे आपला मूलभूत हक्कच असल्याचे लोकप्रतिनिधींच्या कृत्यावरून दिसून येते. चर्चेने मार्ग निघत नसावा असे बहुधा त्यांना वाटत असावे. इटलीसारख्या देशातही लोकप्रतिनिधी गदारोळ घालत असतील, तर भारतातील हे लोण जगभरात पोहोचण्यास फारसा वेळ लागणार नाही.