प्रसूतीनंतर त्वचेची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या सविस्तर
डॉ. पद्मा श्रीवास्तव
योनी आणि गुदद्वारातील नाजूक भागाला पेरिनियम म्हणतात. प्रसूतीनंतर पेरिनियममध्ये वेदना आणि अस्वस्थता याला प्रसूतीनंतरच्या ‘पेरिनल वेदना’ म्हणतात. सामान्य प्रसूतीदरम्यान, बहुतेक स्त्रियांना पेरिनियमच्या भागावर दाब आणि स्ट्रेचिंग असते. जेव्हा बाळाचे डोके योनी मार्गातून बाहेर येते तेव्हा डॉक्टर पेरिनियममध्ये एक छेद देऊन बाळाचे डोके बाहेर काढतात. नंतर या चीर पडलेल्या जागेवर टाके टाकतात, पण बरे होईपर्यंत या भागात दुखत असते.
घरच्या घरी कशी काळजी घ्याल?
हॉट कॉम्प्रेसची थेरेपी : हे लवकर बरे होण्यास मदत करते. प्रसूतीदरम्यान पेरिनियमला हॉट कॉम्प्रेस थेरेपी तेथील मऊ ऊतींना आराम देतात.
चांगली वैयक्तिक स्वच्छता राखा : योनीमार्ग कोमट पाण्याने धुऊन स्वच्छ करावा आणि तेथे केमिकलयुक्त उत्पादने वापरणे टाळावे.
कोल्ड कॉम्प्रेससाठी थेरेपी : स्वच्छ पाणी किंवा थंड पॅक वापरल्याने सूज आणि अस्वस्थता कमी होण्यास मदत होते.
योग्य कपडे परिधान करा : सुती कपड्यांचा वापर करावा. जीन्ससारखे घट्ट कपडे घालणे टाळावे, कारण ते योनीमार्गावरील त्वचेवर आणखी ताण वाढवू शकतात . त्यामुळेबरे होण्यास विलंब होऊ शकतो.
अतिव्यायाम टाळा : नाजूक भागावर ताण येईल असा व्यायाम करणे टाळावे. या भागावर ताण आल्यास वेदना वाढू शकतात.
बसताना सतर्क राहा : बसताना मऊ आणि आरामदायी उशी वापरा. जर कोणतीही क्रिम वापरत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक घ्यावा.
सिट्झ बाथ उपयुक्त ठरू शकते : मिठाच्या पाण्याच्या आंघोळीने लवकर बरे होण्यास मदत होते. मीठ खुल्या जखमेत तयार होणारे बॅक्टेरिया नष्ट करते. ते योनीमार्ग जलद कोरडे करते आणि बरे होण्याच्या प्रक्रियेला गती देते. तो भाग स्वच्छ आणि कोरडा ठेवण्याचा प्रयत्न करावा. नाजूक भागावरील त्वचा जास्त घासली जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
स्टूल सॉफ्टनर वापरायला विसरू नका : खोलवर असलेल्या छेदामुळे मलविसर्जनास अडथळे निर्माण होऊ शकतात. जर मल विसर्जनादरम्यान ताण येत असेल तर डॉक्टरांनी सुचवलेले औषधोपचार करणे योग्य राहाते.