कोल्हापूर : रेल्वेखाली चिरडलेल्या आई अन् मुली इचलकरंजीच्या
कोल्हापूर : Bharat Live News Media वृत्तसेवा : रेल्वेखाली चिरडलेल्या त्या महिलांची ओळख पटली असून आई अन् तिच्या दोन मुली असल्याचे स्पष्ट झाले आहे. सकिना चंदन मुजावर (वय ४०), फिरदोस चंदन मुजावर (२२) आणि अलिशा चंदन मुजावर (१०, रा. सर्वजण जिव्हेश्वर मंदिराजवळ, भोने माळ, इचलकरंजी) अशी मृतांची नावे आहेत. या तिघींनी जीवन संपवले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
मुजावर कुटुंबीय इचलकरंजीत राहते. चंदन मुजावर यांचे स्पेअर पार्ट्सचे दुकान आहे. सकिना मुजावर या शुक्रवारी (१४) जून रोजी दुपारी ४ वाजता बाजारात जाऊन येतो असे सांगून बाहेर पडल्या आणि परत आल्याच नाहीत. त्यामुळे चंदन मुजावर व त्यांचे भाऊ मन्सूर यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान, दै. ‘Bharat Live News Media’मध्ये शनिवारी रेल्वेने तीन महिलांना चिरडल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. मन्सूर मुजावर यांच्या दीपक केसरकर या मित्राने त्याबाबत त्यांना सांगितले. त्यानंतर त्यांनी रेल्वे पोलीस आणि नंतर शाहूपुरी पोलिसांशी संपर्क साधला.
पोलिसांनी त्यांना सीपीआरमधील शवविच्छेदन विभागात आणले. परंतु मन्सूर मुजावर यांना ओळख पटली नाही. अखेर चारच्या सुमारास चंदन मुजावर आले. त्यांनी लहान मुलीला ओळखले.
तिघींचा मृतदेह पाहून मुजावर यांना अश्रू अनावर…
सकिना मुजावर यांचे माहेर मुंबई आहे. त्यांचे आई-वडील, भाऊ मुंबईत आहेत. त्यामुळे वरचेवर मुलींना सुट्टीसाठी म्हणून त्या प्रवास करत होत्या. त्यामुळे त्या मुंबईला गेल्या असतील, असे चंदन मुजावर यांना वाटले. परंतु तिघींचा मृतदेह पाहून मुजावर यांना अश्रू अनावर झाले. मुजावर दाम्पत्याला तीन मुली आहेत. त्यापैकी फिरदोस मोठी असून मुबशरा आणि त्यानंतरची आलिशा सर्वात लहान होती. फिरदोस आणि मुबशरा यांनी प्रिंटिंग डिप्लोमा केला आहे. वडील चंदन यांनी नुकतेच फिरदोसला नवीन दुचाकी आणि मोबाईल घेऊन दिला होता. सकिना यांच्यासोबत फिरदोस व अलिशा होत्या. मुजावर यांची दुसरी मुलगी मुबशरा हुबळी येथे प्रशिक्षणासाठी गेली आहे. त्यामुळे ती बचावली, अशी चर्चा आहे.