साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्याचा आनंद : भारत सासणे
पुणे; Bharat Live News Media वृत्तसेवा : बालसाहित्याच्या लेखनासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्याचा आनंद झाला आहे. प्रत्यक्षात अनेक वर्षे मी बालसाहित्य लिहित आहे. समशेर आणि भूतबंगला या कादंबरीतील पात्र जाणीवपूर्वक निर्माण करून कुमार आणि किशोरवयीन मुलांमध्ये रूजविण्याचा प्रयत्न केला. निर्माण केलेल्या पात्राच्या माध्यमातून किशोरवयीन मुलांना बुद्धिचातुर्य कथा सांगण्याचा प्रयत्न मी या कादंबरीतून केला आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून कादंबरीतील हे पात्र रूजले आहे. याचाही आनंद आहे, अशी भावना ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी साहित्य संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांनी शनिवारी (दि.१५) व्यक्त केली.
साहित्य अकादमीच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांच्या ‘समशेर आणि भूतबंगला’ या कादंबरीला बाल साहित्य पुरस्कार २०२४ जाहीर झाला असून, तुळजापूर येथील देविदास सौदागर यांची ‘उसवण’ कादंबरी युवा पुरस्काराची मानकरी ठरली आहे. विविध भाषांतील बालसाहित्य तसेच युवा पुरस्कारांची घोषणा साहित्य अकादमीकडून शनिवारी केली. यामध्ये असामी, बंगाली, बोडो, डोगरी, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्ऩड, काश्मिरी, कोकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, उडिया, पंजाबी, राजस्थानी, संताली, सिंधी, तमिळ, तेलगू आणि उर्दू भाषेतील लेखकांच्या पुस्तकांचा समावेश आहे. पुरस्कार जाहीर झाल्याचा आनंद सासणे यांनी दै. Bharat Live News Mediaशी व्यक्त केला.
सासणे म्हणाले, ‘समशेर आणि भूतबंगला’ या कादंबरीतील काही भाग ‘साधना’च्या अंकात प्रकाशित झाले आहेत. विशेष म्हणजे साधना अंकासाठीच काही भाग लिहिले आहेत. बालसाहित्यामध्ये वेगवेगळे प्रयोग आज होत आहे. आकर्षक स्वरुपामध्ये पुस्तके छापली जात आहेत. नवनवीन प्रयोग होत असले तरी अधिकाधिक प्रमाणात बालसाहित्य लिहिले जावे आणि दर्जेदार बालसाहित्य पुढे यायला हवे. माझाही हाच प्रयत्न असून, बालसाहित्याच्या क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार जाहीर झाल्याचा खूप आनंद आहे.
हेही वाचा :
Sahitya Akademi Award 2024 | भारत सासणे, देविदास साैदागर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
नीटप्रकरणी शिक्षणमंत्र्यांकडून एनटीएची पाठराखण : प्रियंका चतुर्वेदी
पगारात बचत करुन करोडपती व्हायचंय? ‘हा’ फंडा फॉलो करा