रालोआ सरकारबाबत खर्गे यांच्या विधानावर आठवले भडकले
नवी दिल्ली; Bharat Live News Media वृत्तसेवा : राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार चालणार नाही, या काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या विधानावर रिपब्लीकन पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि संयुक्त जनता दलाचे नेते के. सी. त्यागी शनिवारी भडकले. रालोआ सरकारची काळजी करण्यापेक्षा विरोधी पक्ष म्हणून आपली जबाबदारी पार पाडा, असा सल्ला या दोन्ही नेत्यांनी खर्गे यांना दिला आहे.
डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार होते. काँग्रेसकडे बहुमत नव्हते. मात्र, तरीही या सरकारने आपला कार्यकाळ पूर्ण केला. संपुआचे सरकार लवकरच पडेल, असे विरोधी पक्ष भाजपने कधीही म्हटले नव्हते. त्यामुळे खर्गे यांनी आमच्या सरकारची काळजी सोडून विरोधी पक्ष म्हणून आपली जबाबदारी पार पाडावी, असेही आठवले व त्यागी यांनी म्हटले आहे.