संध्याकाळचा व्यायामही ठरतो लाभदायक

संध्याकाळचा व्यायामही ठरतो लाभदायक

नवी दिल्ली : उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी नियमित व्यायाम गरजेचा ठरतो. आजच्या धावपळीच्या विश्वात, बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक समस्या निर्माण होतात. 8 ते 9 तास काम बसून असेल तर, वजनदेखील झपाट्याने वाढतं. शिवाय शारीरिक समस्यादेखील डोकं वर काढतात. त्यामुळे शरीराला व्यायामाची नितांत गरज असते. यामुळे वजन तर नियंत्रणात राहतेच; पण आजारांचा धोकाही कमी होतो.
व्यायाम केल्याने आपण शारीरिक आणि मानसिकद़ृष्ट्या उत्तम राहातो. पण, सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमुळे लोकांना वर्कआउटसाठी वेळ काढणे थोडे कठीण झाले आहे. काही लोकांचं असं म्हणणं आहे की, फक्त सकाळी व्यायाम केल्याने शरीराला फायदा होतो. पण, असं काहीही नसल्याचे तज्ज्ञ सांगतात. संध्याकाळी व्यायाम केल्यानेदेखील आरोग्याला चांगले फायदे मिळतात.
संध्याकाळी व्यायाम करणे हा एक चांगला पर्याय आहे. संध्याकाळी व्यायाम केल्यामुळे व्यायाम करण्यासाठी वेळदेखील अधिक मिळतो. दिवसभराचं काम संपवून तुम्ही संध्याकाळी निवांत व्यायाम करू शकता. सतत विचार करत व्यायाम केल्याने त्याचा काहीही फायदा होत नाही. जेव्हा तुम्ही सकाळी व्यायाम करता तेव्हा तुमच्या शरीराला वॉर्मअप करण्याची गरज असते. कारण, झोपेतून उठल्यानंतर शरीरातील संपूर्ण ऊर्जा पातळी कमी होते. पण, जर तुम्ही संध्याकाळी व्यायाम करत असाल तर तुम्हाला वॉर्मअप करण्याची गरज नसते.
संध्याकाळी तुम्ही अधिक चांगला व्यायाम करू शकता. व्यायाम केल्यामुळे तणाव दूर होतो. तणाव दूर करण्यासाठी व्यायाम एक उत्तम पर्याय आहे. आजचं धकाधकीचं जिवन आणि जीवनशैलीत तणावाचे बळी आहेत. संध्याकाळी व्यायाम केल्याने दिवसभराचा थकवा आणि तणाव दूर राहतो. व्यायामामुळे स्ट्रेस हार्मोन्स कमी होतात. यामुळे तुम्हाला अधिक आराम वाटतो. रोजच्या कामाने रात्री चांगली झोप लागत नाही. अशात संध्याकाळी व्यायाम केल्याने तणाव दूर होतो आणि रात्री शांत झोप लागते. संध्याकाळी व्यायाम केल्यास स्नायू शिथिल राहतात.