तडका : आनंदवाडीतील आनंद

लोकसभा निवडणुका पार पडल्या आणि लातूर जिल्ह्यातील आनंदवाडी या गावातून एक खरोखर आनंद वाटावा अशी घटना घडली आहे. एका चांगल्या बातमीकडे आपले लक्ष वेधून घ्यावे म्हणून हा लेखन प्रपंच.
‘निवडणुकीमध्ये मतदान मिळावे म्हणून कोणतेही आमिष कृपया आमच्या गावातील मतदारांना देऊ नका,’ अशी कळकळीची विनंती करणारे गावसुद्धा महाराष्ट्रात आहे, याचा आपणा सर्वांना अभिमान वाटला पाहिजे. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील आनंदवाडी या गावाने हा आनंददायी उपक्रम राबवून यशस्वीपणे अमलातसुद्धा आणला आहे. या गावाने Bharat Live News Media मंडळी आणि उमेदवारांना ‘आमच्या गावात पैसे वाटणे किंवा दारू पुरवठा चालणार नाही,’ असे निक्षून सांगितल्यामुळे या गावात कुणीही पैसे वाटायला आले नाही.
आनंदवाडी गाव असा निर्धार का करू शकले, याची पण एक विलक्षण कहाणी आहे. महिलांच्या हाती सत्ता असणार्या आनंदवाडीमध्ये ग्रामपंचायतीच्या गेल्या तीन टर्म बिनविरोध झाल्या आहेत. खुल्या प्रवर्गासाठी सरपंच निवडण्याची मुभा असतानाही सध्या एक ओबीसी महिला सरपंचपदी आहे. असे सर्व असूनही पुन्हा निवडणुकीमध्ये सर्व प्रकारचे आमिष नाकारणारे गाव म्हणून आनंदवाडीची चर्चा होणे आवश्यक आहे. तसे पाहता आनंदवाडी हे छोटेसे गाव आहे. या गावात जेमतेम 112 घरे आहेत.
शहरांमधील बंगल्यांच्या बाहेर मालक आणि मालकीण या दोघांची नावे लिहिलेली असतात, हे आपण नेहमी पाहतो. आनंदवाडीतील प्रत्येक घराची मालकी महिलेचीच आहे. नुसती घराबाहेर पाटी लावून ही मालमत्ता त्या महिलेची नाही, तर मालमत्ता नोंदीमध्ये पण महिलेचेच नाव आहे. गावातील शेतीमध्येही महिलांचा 50 टक्के वाटा आहे. त्यामुळे घरातील महिलेला विचारल्याशिवाय शेतीचे व्यवहारही होत नाहीत. या छोट्याशा गावाने माहाराष्ट्रासमोर ठेवलेला आदर्श चकित करणारा आहे. भंडारा असतो तेव्हा पंगतीमध्ये गावजेवण दिले जाते. आनंदवाडी गावात जेव्हा अशी काही पंगत बसते, तेव्हा पहिला जेवणाचा मान महिलांचा असतो. पुरुष मंडळी या महिलांच्या पहिल्या पंगतीला जेवायला वाढतात. सर्वप्रथम मुले आणि महिला जेवतात आणि पुरुषांची पंगत यानंतर असते.
आधुनिक काळाच्याही पुढे चालणार्या या गावातील 417 जणांनी अवयवदानाचे अर्ज भरून तशी नोंद करून ठेवली आहे. गावाबाहेर एक पाटी लावलेली आहे, त्यावर ‘सोयरीक करायची असेल तर हुंडा देता-घेता येणार नाही,’ असे स्पष्टपणे लिहिले आहे. याचा अर्थ सोयरिकीसाठी येणार्या लोकांना या गावात ऋणानुबंध जुळवायचे असतील तर हुंडा पद्धत चालणार नाही, याची स्पष्ट कल्पना येते. आनंदवाडीमधील गरीब घरातील मुलींच्या लग्नाचा प्रश्न गावकरी चर्चा करून सोडवतात. मंदिराच्या मालकीच्या असलेल्या एका दुकानाला ग्रामपंचायत कोणतेही भाडे आकारत नाही आणि त्या बदल्यात तो दुकानदार गावातील मुलींच्या लग्नाचा मंडप आणि इतर डेकोरेशन मोफत करून देतो. मुलीला वाटी लावताना भांडेकुंडे, पलंग गादी इत्यादी रुखवत देणे आवश्यक असते. हा खर्च साधारणतः दीड ते दोन लाखांचा होतो, जो आनंदवाडी गावातील सर्व ग्रामस्थ मिळून उचलतात. आहे की नाही खरोखरची आनंदवाडी!
निवडणुकीत आपले मतदान विकणार नाही, असा निर्धार करून ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ निर्माण करणार्या आनंदवाडी ग्रामस्थांना आमचे वंदन.
