कोल्हापूर : अल्पवयीन मुलांना दोरीने बांधून अमानुष मारहाण

नेसरी ः हडलगे (ता. गडहिंग्लज) येथे पोल्ट्रीशेजारी खेळणार्‍या मुलांमुळे कोंबड्या दगावल्याचा आरोप करून येथील एका पोल्ट्रीचालकाने तीन अल्पवयीन मुलांना बांधून घालून अमानुष मारहाण केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. या प्रकरणाची चित्रफीत सर्वत्र व्हायरल झाल्यावर मोठी खळबळ उडाली. दरम्यान, रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोल्ट्रीशेजारी खेळणार्‍या मुलांनी पाण्याच्या टाकीत पाईप क्लिनिंगचे केमिकल टाकल्याने …

कोल्हापूर : अल्पवयीन मुलांना दोरीने बांधून अमानुष मारहाण

नेसरी ः हडलगे (ता. गडहिंग्लज) येथे पोल्ट्रीशेजारी खेळणार्‍या मुलांमुळे कोंबड्या दगावल्याचा आरोप करून येथील एका पोल्ट्रीचालकाने तीन अल्पवयीन मुलांना बांधून घालून अमानुष मारहाण केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. या प्रकरणाची चित्रफीत सर्वत्र व्हायरल झाल्यावर मोठी खळबळ उडाली. दरम्यान, रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोल्ट्रीशेजारी खेळणार्‍या मुलांनी पाण्याच्या टाकीत पाईप क्लिनिंगचे केमिकल टाकल्याने पोल्ट्रीमध्ये पाणी सांडून त्यामुळे कोंबड्या दगावल्याचा राग पोल्ट्रीचालकाला होता. त्यातूनच त्याने तीन अल्पवयीन मुलांना बांधून घालून मारहाण केल्याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला. दरम्यान, यातील मुलांच्या पालकांनी नेसरी पोलिसांत धाव घेऊन विजय सुभाष कुंभार (वय 30, रा. हडलगे) याच्याविरोधात फिर्याद दिली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, हडलगे गावानजीक असलेल्या कुंभार यांच्या पोल्ट्री फार्मजवळ मंगळवारी मुले खेळत होती. यावेळी काही मुलांनी पोल्ट्रीच्या पाण्याच्या टाकीत पाईप क्लिनिंगचे केमिकल टाकल्याने पोल्ट्रीमध्येही पाणी सांडले होते. यामुळे फार्ममधील कोंबड्या दगावल्याचा राग कुंभार याला आला होता. याच रागातून पोल्ट्रीचालक कुंभार याने अल्पवयीन मुलांना बांधून घालून लाकडी पट्टी व लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली होती. त्यावेळी या संपूर्ण घटनेचा व्हिडीओही तयार करण्यात आला होता.
मंगळवारी दिवसभर या प्रकरणाची दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. बुधवारी सकाळी अल्पवयीन मुलांना मारहाण झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली. त्यानंतर मुलांच्या पालकांनी नेसरी पोलिसांत संबंधित कुंभार याच्याविरोधात फिर्याद दिली. मुले अल्पवयीन असल्याने नेसरी पोलिसांनी या प्रकरणात बालक संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत कुंभार याला ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू केली आहे. हडलगे हे नेसरी पोलिस ठाणेअंतर्गत येत असून, अनेक वृत्तवाहिन्यांवर अल्पवयीन मुलांना मारहाण झाल्याची बातमी झळकल्यानंतर याप्रकरणी अखेर उशिरा गुन्हा दाखल झाला.