कोल्हापुरात रिक्षा-टॅक्सी चालकांचा विराट मोर्चा
कोल्हापूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : रिक्षा, टॅक्सीसह विविध वाहनांच्या पासिंगचा विलंब आकार रद्द करावा, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा रिक्षा व टॅक्सी वाहनधारक समितीतर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर वाहनांसह मोर्चा काढण्यात आला. रिक्षा, टॅक्सीसह निघालेल्या या विराट मोर्चामुळे दसरा चौक ते असेम्ब्ली रोड या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.
‘देणार नाही… देणार नाही… एक रुपयाही देणार नाही’, ‘रद्द करा… रद्द करा… विलंब आकार रद्द करा’, ‘या सरकारचं करायचं काय, खाली डोकं, वर पाय,’ आदी विविध घोषणा देत दसरा चौकातून मोर्चास सुुरुवात झाली. रिक्षा, टॅक्सीसह अन्य वाहने मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. शेकडो वाहने एकाचवेळी दसरा चौकात आल्याने चौकात येणारी चहुबाजूची वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांनी दसरा चौकात येणारे सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवले होते. सर्वात पुढे नेते, कार्यकर्ते आणि त्यांच्या मागे सर्व वाहने अशी मोर्चास सुरुवात झाली. दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, असेम्ब्ली रोडमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आला. मोर्चात वाहने मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने मोर्चा मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे परिसरातील मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली.
रिक्षाचालक आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून मोर्चाचा मार्ग दणाणून सोडला. रिक्षाचालकांचे एवढ्या मोठ्या संख्येने आंदोलन अलीकडच्या काळात प्रथमच झाल्याची आठवण अनेक रिक्षाचालकांनी करून दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चा येताच रिक्षाचालक व कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यामुळे पुन्हा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी विविध वक्त्यांनी भावना व्यक्त करून सरकारचा निषेध केला.
शिवसेना (उबाठा) सहसंपर्कप्रमुख विजय देवणे म्हणाले, मुख्यमंत्री रिक्षाचालक होते. त्यांना रिक्षा व्यवसायाच्या समस्या माहीत आहेत. ते स्वत: म्हणतात, आपले सरकार तीनचाकी आहे; मग असे असताना रिक्षाचालकांवर अन्याय का? रिक्षाचालकांना डिवचण्याचा प्रयत्न करू नका. शहरातील खराब रस्त्यांप्रकरणी रिक्षाचालकांनी केलेल्या आंदोलनामुळेच रस्ते चकाचक बनले होते. हा अनुभव आहे. पालकमंत्री म्हणतात, माझे काय चुकले का? तुमचे नाही, आमचे चुकले. तुमचे सरकार ठेेवले ही चूक झाली. कोल्हापूरचे सुपुत्र आहात. येत्या कॅबिनेट बैठकीत विलंब आकार रद्दचा निर्णय घ्या. सरकारकडून काही होत नसेल, तर तुम्ही स्वत: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करा. शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, या सरकारने नेहमी सर्वसामान्यांवर अन्याय केला आहे. लोकसभेला त्यांना जागा दाखविली आहे. आता विधानसभेतही त्यांना खाली खेचूया. यावेळी सतीशचंद्र कांबळे, ‘आप’चे संदीप देसाई, माजी नगरसेवक तौफीक मुल्लाणी यांची भाषणे झाली. शिष्टमंडळातर्फे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन दिले.
विजय देवणे, संजय पवार, संदीप देसाई, अॅड. बाबा इंदुलकर, सतीशचंद्र कांबळे, सुनील मोदी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात चंद्रकांत भोसले, राजू जाधव, अविनाश दिंडे, शंकरलाल पंडित, मोहन बागडी, राहुल पोवार, राकेश गायकवाड, सुभाष शेटे, ईश्वर चन्नी, अशोक जाधव, अरुण घोरपडे, शिवाजी पाटील, पोपट रेडेकर, संजय पाटील, महेश वासुदेव, संभाजी माने, अतुल पोवार, सूरज कवाळे, आदम बांगी, जाफर मुजावर, सौरभ बाराते, राजू मुजावर, श्रीकांत पाटील यांच्यासह रिक्षाचालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.