रायगड: पहिल्याच पावसात खैरे येथे दरड कोसळली; नागरिक भयभीत
महाड, Bharat Live News Media वृत्तसेवा: महाड तालुक्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे आज (दि.१२) दुपारी एमआयडीसी विभागातील खैरे येथे नागरी वस्तीला लागून असलेली दरड कोसळली. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, गावाशेजारी कंपनीच्या सुरू असलेल्या कामांमुळेच ही दरड कोसळली आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे. गाव दरडग्रस्त यादीमध्ये असताना शासनाने या ठिकाणी कंपनीला परवानगी का दिली? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पहिल्याच पावसात दरड कोसळून घरावर आल्याने गावातील नागरिक भयभीत झाले आहेत. गाव दरडग्रस्त असताना प्रशासनाने दोन कंपन्यांना जागा दिली आहे. येथे मोठ्या प्रमाणात खोदकाम केले आहे. त्यामुळेच गावावर दरड कोसळली आहे. या कंपन्यांना नागरिकांचा विरोध असताना याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले, असा आरोप नागरिकांनी केला आहे. पहिल्याच पावसात तासभर पाऊस पडल्यानंतर दरड कोसळली असेल तर पुढील काळात पडणाऱ्या जोरदार पावसात नेमके काय घडेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत.
दरड कोसळल्यानंतर अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत.
– महेश शितोळे, तहसीलदार, महाड
हेही वाचा
रायगड: आंबेवाडी येथे अर्धवट कामामुळे महामार्ग पाण्यात, वाहनधारकांची कसरत
३५०वा राज्याभिषेक दिन : छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची राजधानी रायगडची निर्माती कशी केली?
रायगड: जिल्ह्यात ३२.४२ टक्के पाणीसाठा उपलब्ध, धरणक्षेत्रात १० टक्केपेक्षा कमी पाणी