भंडारा : विद्यार्थीनीचे शारीरिक शोषण, २ महिन्याची गर्भवती; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
भंडारा; Bharat Live News Media वृत्तसेवा : १४ वर्षीय शाळकरी विद्यार्थीनीसोबत ओळख निर्माण करुन तिचे वारंवार शोषण केल्याने ती २ महिन्याची गर्भवती राहिली. ही बाब तिच्या पालकांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सिहोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
सदर विद्यार्थीनी तुमसर तालुक्यातील बपेरा येथील शाळेत शिकत असताना तिची आरोपी अल्पवयीन आरोपीसोबत ओळख झाली. त्यानंतर त्यांच्या नियमित भेटीगाठी सुरू झाल्या. १ जानेवारी २०२४ रोजी पिडीत विद्यार्थीनी शाळेतून आपल्या घरी परत जात असताना कालव्याच्या बाजुला असलेल्या शेतात व त्यानंतरच्या कालावधीत चांदपूर जंगल परिसरात आरोपी मुलाने सदर विद्यार्थीनीचे शारीरिक शोषण केले. दरम्यानच्या कालावधीत पिडीत विद्यार्थीनीला मासीक पाळी न आल्याने तिच्या आईवडीलांनी उपचारासाठी तिला नागपूरच्या एम्स रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासल्यानंतर ती दोन महिन्याची गर्भवती असल्याचा अभिप्राय दिला.
या अभिप्रायावरुन नागपूरच्या सोनेगाव पोलीस ठाण्यात आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. परंतु, या घटनेचे ठिकाण सिहोरा पोलीस स्टेशन हद्दीतील असल्याने सिहोरा पोलीस ठाण्यात आरोपी मुलाविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सिहोरा पोलीस करीत आहेत.