कोल्हापूर: भादोले येथे वानराने अंगावर उडी मारल्याने वृद्धाचा मृत्यू
खोची, Bharat Live News Media वृत्तसेवा: वानराने अंगावर पाठीमागून उडी मारल्याने भादोले येथील आनंदा येसू कुंभार (वय ८५ ) गंभीर जखमी झाले.
कोल्हापूर येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची आज (दि.१२) प्राणज्योत मालवली. या घटनेबद्दल गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्याचबरोबर मोकाट वानरांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.
भादोले येथील आनंदा येसू कुंभार नेहमीप्रमाणे सायंकाळी फिरावयास गेले होते. घरी परत येत असताना त्यांच्या अंगावर वानराने उडी मारली. पाठीमागून उडी मारल्यामुळे ते समोर तोंडावर पडले. दात घुसल्याने रक्त आले. यावेळी प्राथमिक उपचार करून त्यांना घरी आणण्यात आले. परंतु दुसऱ्या दिवशी वेदना असह्य झाल्यामुळे त्यांना कोल्हापूर येथे खासगी रूग्णालयात दाखल केले. या घटनेची पोलिसात नोंद झाली आहे.
यावेळी जोरदार आघात झाल्यामुळे छातीत रक्तस्त्राव झाला असल्याचे सांगण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
वानरामुळे लहान मुलाला जीव गमवावा लागला.
वानरामुळे मागील काही दिवसांपूर्वी एका लहान मुलाला आपला जीव गमवावा लागला. मागील काही दिवसांपासून वानरांचा गावठाण भागात वावर वाढला आहे. नुकसान आणि त्रास होत असल्यामुळे सर्वसामान्य अक्षरशः मेटाकुटीस आले आहेत. वन्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाने वानरांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी होत आहे.
हेही वाचा
कोल्हापूर, हुपरी परिसरात बनावट सोन्याचा कारखाना?
ICC T20 Rankings : जसप्रीत बुमराहची ICC क्रमवारीत मोठी झेप, टॉप 10 मध्ये जबरदस्त बदल
कोल्हापूर : सीपीआर परिचर्या महाविद्यालयातील तीन मुली 24 तासांनंतर सुखरूप