थकित रक्कमेसाठी ऊस उत्पादकांचे कारखान्यासमोर आंदोलन
भंडारा, Bharat Live News Media वृत्तसेवा : देव्हाडा येथील मानस साखर कारखान्यामध्ये ऊस घातल्यानंतरही शेतकऱ्यांची बिले अजूनही थकित आहेत. राहिलेली थकित बिले तातडीने देण्यात यावीत, यासाठी मंगळवारी (दि.11) शेतकऱ्यांनी कारखान्याच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले.
मानस साखर कारखान्याचा गाळप हंगाम नोव्हेंबर महिन्यात सुरू झाला होता. ऊस गाळप हंगामाला जवळपास सहा महिने झाले आहेत. तेव्हापासून शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस दिला आहे. अद्यापही शेतकऱ्यांना उसाची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी तीन दिवसांत उसाची रक्कम देण्यासंबंधी मागणी केली होती. परंतु, कारखाना व्यवस्थापनाने या गोष्टीची कोणत्याही प्रकारे दखल घेतली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले आहे.
25 जूनपर्यंत साखर कारखान्याकडून पैसे दिले गेले नाही, तर 26 जून रोजी पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. या आंदोलनाची दखल घेत कारखाना व्यवस्थापनाने आंदोलनकर्त्यांना 25 जूनपर्यंत सर्व शेतकऱ्यांची शिल्लक रक्कम देण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. यावेळी यादोराव मुगंमोडे, धनू परशुरामकर, मनीष परशुरामकर, विजय काशीवार व परिसरातील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.
हेही वाचा :
कार्यकर्ते आकडेमोडीत, शेतकरी मशागतीत गर्क; पेरणीपूर्व मशागतीला आला वेग
दौंडसाठी स्वतंत्र महसूल अधिकारी नेमावा; शेतकरी व नागरिकांची मागणी
नीट परीक्षा गोंधळाची सीबीआय चौकशी करा, ठाकरे गटाची मागणी