रायगड: आंबेवाडी येथे अर्धवट कामामुळे महामार्ग पाण्यात, वाहनधारकांची कसरत
कोलाड: Bharat Live News Media वृत्तसेवा: रोहा तालुक्यातील मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आंबेवाडी नाक्यावर अर्धवट कामामुळे पहिल्या पावसात नागरिकांना मोठा फटका बसला आहे. कोलाड परिसरात बुधवारी (दि. १२) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे आंबेवाडी बाजारपेठेत क्षणातच पाणीच पाणी होऊन पुरस्थिती निर्माण झाली. पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागली.
आंबेवाडी बाजारपेठेतील निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे मंगळवारी नागरिकांनी रास्ता रोको केला होता. तर दुसऱ्याच दिवशी आज तुफान पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली. याचा नाहक त्रास वाहन चालकांसह प्रवाशी वर्ग तसेच येथील नागरिकांना बसला.
आंबेवाडी बाजारपेठेतील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. रस्ता खाली तर गटार उंचीवर झाल्यामुळे थोडा जरी पाऊस पडला, तरी या संपूर्ण बाजारपेठेत पाणीच पाणी होऊन पुरस्थिती निर्माण होते. ठेकेदाराची मनमानी सुरू असून प्रशासनाचा कोणताही वचक नाही. येथे दररोज छोटे मोठे अपघात होत आहेत. तरी तत्काळ उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी आणि वाहन धारकांनी दिली आहे.
स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड
किल्ले रायगडावरील पायरी मार्ग २३ व २४ मे रोजी राहणार बंद!
रायगड : नऊ महिन्यांनंतरही इर्शाळवाडीतील ४३ कुटुंबे पक्क्या घरापासून वंचित