दूध पावडर परस्पर विक्री करणाऱ्या दोघां विरुध्द गुन्हा दाखल
जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा – शहरातील विकास दूध फेडरेशन येथील दूध पावडर ट्रक मध्ये भरून लखनौ या निश्चित ठिकाणी न नेता परस्पर विक्रीस नेण्यात आले. 74 लाख 45 हजार रुपयाचा अपहर प्रकरणी मंगळवार (दि.११) रोजी मध्यरात्री १ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, येथील शिवाजीनगर विकास दूध फेडरेशन मध्ये दुधापासून बनवलेले पदार्थ बनविले जातात. हे पदार्थ शहरासह इतर राज्यात देखील वितरण करण्यात येतात. येथे दूध पावडर देखील विक्री केली जाते. बुधवार (दि.५) रोजी सायंकाळी ६ वाजता ट्रक क्रमांक आर जे ११ जी बी ९५७९ मध्ये विकास दूध फेडरेशनचे दूध पावडर घेऊन लखनौ येथे जाण्यासाठी ट्रकचालक फिरोज सरजूद्दीन (रा. आग्रा, उत्तर प्रदेश) आणि त्याच्यासोबत असलेला क्लीनर रसतम कमलेश बघेल (रा. चतुर, राज्य मध्यप्रदेश) या दोघाकडे दुध पावडरने भरलेला ट्रक स्वाधीन करण्यात आला. ट्रकचालक व क्लिनर यांनी दूध पावडरने भरलेला ट्रक लखनौ येथे निश्चित स्थळी न नेता त्याची परस्पर विल्हेवाट लावून दुधपावडरच्या ट्रकचा अपहार केला आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस ठाण्यात दोघां विरोधात 74 लाख 45 हजाराचा अपहार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार मंगळवार (दि.११) रोजी मध्यरात्री १ वाजता दोन जणांवर जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भवारी हे करीत आहेत.
हेही वाचा:
नाशिक: पाण्यासाठी देवळ्यात उपोषण; पंचक्राेशीतील ग्रामस्थांचाही पाठींबा
Nashik | ‘जिल्हाधिकाऱ्यां’च्या संकेतस्थळावर पवार, गोडसे खासदार